क्युबा : क्युबाचे माजी राष्ट्रपती आणि महान क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन झालं आहे. वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला एकहाती नमवणारा धाडसी क्रांतिकारी म्हणून फिडेल यांना ओळखलं जातं.
क्युबामधील ओरिएंट प्रांतात 13 ऑगस्टच 1926 रोजी फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म झाला. रोमन कॅथलिक स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन, पुढे हावाना विद्यापीठातून वकिली आणि समाजशास्त्रात पदवी मिळवली.
घरात श्रीमंती असूनही दिनदुबळ्यांच्या व्यथा फिडेल यांना जाणवत होत्या. अशातच त्यांच्यावर कार्ल मार्क्स आणि रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता लेनिन यांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्यानंतर ते कम्युनिस्ट विचारांकडे वळले. अमेरिकेच्या भांडवलशाही वृत्तीला बंधू राऊल कॅस्ट्रो आणि क्रांतीकारी चे गव्हेरा यांच्या मदतीने आव्हान निर्माण केलं. मुंगीएवढा असलेल्या क्युबा देशाने बलाढ्य अमेरिकेलाही जेरीस आणलं.
फिडेल कॅस्ट्रो हे क्युबामधील कम्युनिस्ट पार्टीचे पहिले सचिव होते. फेब्रुवारी 1959 ते डिसेंबर 1976 एवढा दीर्घ काळ त्यांनी क्युबाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर राष्ट्रपती म्हणून काम पाहू लागले. जुलै 2006 साली प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी सर्व सूत्र राहुल कॅस्ट्रो यांच्याकडे सोपवली. शिवाय, फेब्रुवारी 2008 साली त्यांनी राष्ट्रपतीपदाचाही राजीनामा दिला. एखाद्या देशाचं प्रमुखपद एवढा मोठा काळ सांभाळणारे फिडेल कॅस्ट्रो हे जगात एकमेव नेते होते.