मुंबई : कोविड 19 मुळे अन्नसंकट पहिल्यापेक्षा दुप्पट होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय. जगभरात अन्नान्न दशा होणाऱ्यांची संख्या यावर्षी उद्धवलेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे तब्बल दुप्पट होईल असं संयुक्त राष्ट्रांच्या विश्व खाद्यान्न कार्यक्रमाच्या वतीने जाहीर करण्यात आलंय. यावर्षी 265 दशलक्ष म्हणजे 26 कोटी पन्नास लाख लोकसंख्येला अन्नसंकटाचा सामना करावा लागेल. कोविड 19 यामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक मंदीमुळे हा आकडा वाढत असल्याची भितीही संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलीय.
एरवी सामान्य परिस्थिती असताना जगभरात तब्बल 135 दशलक्ष म्हणजेच 13 कोटी पन्नास लाख लोकसंख्येला अन्नान्न दशेचा सामना करावा लागतो. त्यात यावर्षीच्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अपेक्षित आर्थिक संकटामुळे त्यात तब्बल 130 कोटींची भर पडण्याची भिती आहे. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जागतिक तसंच देशांतर्गत पर्यटनावर येणारे निर्बंध, घटणारे अर्थव्यवहार यामुळे हा फटका बसण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ अरीफ हुसेन यांच्या मते कोरोना व्हायरसच्या महामारीने संबंध विश्वाला युद्धजन्य परिस्थितीत आणून ठेवलंय. संबध जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीषण आर्थिक महामंदीविषयी चर्चा सुरु आहे. त्यात अन्नसंकट हे खूप महत्वाचं असणार आहे. या संकटाचा आपण आत्ताच विचार केला नाही तर भविष्यात त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, अनेकांना जीव गमवावे लागतील तर कित्येकाचं आयुष्य पणाला लागेल.
खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी आता जवळ जे काही आहे, ते विकायला सुरुवात झालीय. उद्या काही शेतकऱ्यांना रोजीरोटीसाठी आपले बैल किंवा नांगर विकावे लागले तर भविष्यातील अन्नसंकट आजवर येऊन ठेपेल. त्यांना दररोजच्या जेवणासाठी भविष्यात महत्वाच्या ठरतील अशा वस्तू विकण्याची वेळ येऊ देता कामा नये. आज शेतकऱ्यांवर अन्नासाठी बैल आणि नांगर विकण्याची वेळ आली तर त्यामुळे पुढच्या अनेक वर्षातली अन्न उत्पादन ठप्प होईल.
कोरोना व्हायरसच्या साथीपूर्वी ज्यांची स्थिती यथातथा होती ती कोरोनानंतर तशी नसणार आहे. ज्या देशांमध्ये संबंधित सरकारांकडून सामाजिक सुरक्षेचे पुरेसे कार्यक्रम राबवले जात नााहीत, तेथील परिस्थिती जास्तच भीषण होणार आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांनी कुठे कुठे कुपोषण किंवा अन्नसंकटाची स्थिती असेल, याविषयी नेमकी माहिती दिली नसली तरी आफ्रिकेला अन्नसंकटाचा सर्वाधिक सामना करावा लागण्याची भिती आहे.
जागतिक अन्न संकटाचा सामना करण्यासाठी यावर्षी तब्बल 10 ते 12 अब्ज डॉलर्स निधीची आवश्यकता लागेल असंही अरीफ हुसेन यांनी सांगितलं. गेल्यावर्षी जमा करण्यात आलेला निधी हा आजवरचा सर्वाधिक म्हणजे 8.3 अब्ज डॉलर्स होता. पण यावर्षी कोविड 19 च्या महामारीमुळे तो ही कमी पडू शकतो.
Food Crisis | कोविड 19 मुळे अन्नसंकट पहिल्यापेक्षा दुप्पट होईल, संयुक्त राष्ट्रांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2020 01:25 PM (IST)
सामान्य परिस्थिती असताना जगभरात तब्बल 135 दशलक्ष म्हणजेच 13 कोटी पन्नास लाख लोकसंख्येला अन्नान्न दशेचा सामना करावा लागतो. त्यात यावर्षीच्या कोरोना व्हायरसच्या साथीमुळे अपेक्षित आर्थिक संकटामुळे त्यात तब्बल 130 कोटींची भर पडण्याची भिती आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -