बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. यावेळी वुहान शहरात नाही तर हार्बिन शहराला कोरोनाने आपलं केंद्र बनवलं आहे. चीनची राजधानी बीजिंगपासून 1 हजार 240 किलोमीटर दूर असलेलं हार्बिन शहरामध्ये 70 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


हार्बिन हे चीनमधील हेलॉन्गजियांग प्रांताची राजधानी आहे. येथील लोकसंख्या जवळपास एक कोटी आहे. 53 हजार 523 वर्ग किलोमीटर परिसरात वसलेल्या या मोठ्या शहरात 131 जिल्हे, 107 तालुके, 62 टाऊनशिप आणि 1 हजार 879 गावं आहेत. आकाराने हार्बिन भारताच्या राजधानीचं ठिकाण असलेल्या दिल्लीहून 36 पटिंनी मोठं आहे. या शहरात 70 रूग्ण समोर आल्यानंतर चीन शहर लॉकडाऊन केलं आहे.


हार्बिनमध्ये ज्या 70 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या नातेवाईकांवर नजर ठेवण्यात येत आहे. कॉन्टेक्ट ट्रेसिंगसाठी शेकडो लोकांची टीम तयार करण्यात आली आहे. हार्बिनमध्ये फक्त त्याच लोकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांनी कोरोना अॅप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल केलं आहे आणि ज्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमधील अधिकाऱ्यांनी असा दावा केला आहे की, हार्बिनमध्ये कोरोना पसरण्यामागील सर्वात मोठं कारण न्यूयॉर्कमधून परतलेला एक विद्यार्थी आहे. या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणि आजूबाजूच्या 4 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यावेळी त्यातील 70 लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे.


चीन सरकार देशातमध्ये फक्त कोरोनाचे दोन रूग्ण असल्याचा दावा करत आहे. अशातच हार्बिन शहरामध्ये 70 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. चीन सरकारने हादेखील दावा केला आहे की, मागील आठ दिवसांपासून कोरोना व्हायरसमुळे कोणचाही मृत्यू झालेला नाही. आता हार्बिनमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातमीने चीन सरकार करत असलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 27 लाख 18 हजारांवर


Jio-Facebook करारानंतर मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती


'कोणतीही चूक करू नका, कोरोना आपल्यासोबत बराच काळ राहणार'; कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर WHOचा इशारा