Firing In USA On Independenc Day: अमेरिकेतील शिकागोच्या हायलँड पार्कमध्ये सोमवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त परेड काढण्यात आली होती. मात्र यावेळी अचानक गोळीबार झाला. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इलिनॉयच्या गव्हर्नरने दावा केला आहे की, या गोळीबारात 5 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 57 लोक जखमी झाले आहेत. उंच इमारतीवरून हा गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


या घटनेची माहिती ट्वीट करत प्रशासनाने लोकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस आणि तपास पथकांना त्यांचे काम करू द्या, असं ट्वीटमध्ये सांगण्यात आले आहे. डब्ल्यूजीएन टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, गोळीबारात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर संशयित पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


अमेरिकन प्रतिनिधी ब्रॅड श्नाइडर यांनी रॉयटर्सला सांगितले की, हायलँड पार्कमध्ये गोळीबार सुरू झाला, तेव्हा ते आणि त्याचा जिल्ह्याचा प्रचार पथक परेडमध्ये सर्वात पुढे होते. श्नाइडर यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, "अनेकांचा जीव गेला आहे आणि बरेच जण जखमी झाले आहेत. हल्ल्यातील सर्व मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझी संवेदना आहे.






शिकागो सन-टाइम्सच्या वृत्तानुसार, परेड सुरू झाल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी गोळीबार झाला. यानंतर परेड थांबवण्यात आली. जीव वाचवण्यासाठी शेकडो लोक इकडे तिकडे धावू लागले. शिकागोच्या CBS 2 टेलिव्हिजनने परेडमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा हवाला देत म्हटले आहे की, मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकून लोक घटनास्थळावरून पळू लागले.