Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. श्रीलंकेमध्ये सध्या भीषण वीज संकट आहे. पुरेसा वीजपुरवठा नसल्यामुळे नागरिकांना लोडशेडींगला सामोरं जावं लागत आहे. इंधन संकटामुळे श्रीलंकेनं 04 जुलैपासून शाळा एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागानं रविवारी सांगितलं की, 'सरकारी आणि राज्य-मान्यताप्राप्त खाजगी शाळा आठवडाभर बंद राहतील, कारण शिक्षक आणि पालकांना मुलांना वर्गात आणण्यासाठी पुरेसे इंधन नाही.'


श्रीलंकेच्या मंत्र्यांनी सांगितलं आहे की, 'शाळा बंद असल्याच्या कालावधीतील अभ्यासक्रमाचा समावेश पुढील अभ्यासक्रमात करण्यात येईल. गेल्या महिन्यातही इंधनाअभावी ग्रामीण भागातील शाळा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. तर गेल्या दोन आठवड्यांपासून देशभरातील शहरी भागात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.


एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, श्रीलंकेच्या शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे की, 'कोलंबो शहराच्या हद्दीतील सर्व सरकारी आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी शाळा तसेच इतर प्रांतातील इतर प्रमुख शहरांमधील शाळा पुढील आठवडाभर बंद राहतील.


देशाच्या शिक्षण मंत्रालयाचे सचिव निहाल रणसिंघे यांनी शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगितलं आहे. दरम्यान, विभागीय स्तरावर शाळांना कमी विद्यार्थ्यांसह वर्ग चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे, जेणेकरून वाहतुकीच्या अडचणींचा विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर परिणाम होणार नाही.


पेट्रोल-डिझेलचा साठा संपला


आर्थिक संकटाशी दोन हात करत असलेल्या श्रीलंकेसमोरील आव्हाने संपुष्टात येण्याची चिन्हं नाहीत. श्रीलंकेतील इंधन साठा जवळपास संपला असून सरकारने दोन आठवडे इंधन विक्रीवर बंदी घातली होती. देशात असलेल्या इंधन साठ्यातून सध्या फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे सरकारने म्हटलं. या अत्यावश्यक सेवेत आरोग्य, कायदा-सुव्यवस्था, बंदरे, विमानतळ, अन्नधान्य वितरण आणि कृषी क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.  तर, Non-Essential Services 10 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या