वॉशिंगटन : जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्यातला दुसरा आणि शेवटची डिबेट काल (गुरुवार) पार पडली. पहिल्या डिबेटमधली चर्चा अक्षरशः उधळली गेल्याच्या पार्श्वभूमीवर, या डिबेटमधे बर्याच प्रमाणात मुद्देसूद चर्चा झाली. हा डिबेट लोकांना आवडला असला, तरी त्याचा मतदानावर काही परिणाम होईल का याविषयी साशंकता आहे.
मागच्या डिबेटपेक्षा यावेळी ट्रम्प यांचा परफॉर्मन्स बराच चांगला झाला असला, तरी त्यांना बायडन यांच्यावर मात करता आली नाही. पहिल्या डिबेटमधे केलेल्या आक्रस्ताळ्या वर्तनामुळे ट्रम्प यांनी बरीच आघाडी गमावली होती. या शेवटच्या डिबेटमध्येसुध्दा कोविड, हेल्थकेअर, वर्णद्वेषी वातावरण, निर्वासित बालकांना दिलेली वागणूक यासारखे मुद्दे ट्रम्प यांना अडचणीचे ठरले. क्लायमेट चेंजबद्दल बोलताना जाता-जाता त्यांनी भारताबद्दल अनुदार टिप्पणी केली, ती वेगळीच. आणि दुसरीकडे बायडन यांनी आपण देशाला सर्वसमावेशक नेतृत्व देऊ, असा दावा केला.
प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत आपला विजय होणं लोकांसाठी आणि देशासाठी कसं महत्वाचं आहे, हे लोकांसमोर मांडण्याची शेवटची संधी म्हणजे शेवटचा डिबेट असतो. मात्र, बायडन यांच्या बाजूनं झुकलेलं जनमत चाचण्यांचा कौल पाहता, लोकांपर्यंत काही नवीन संदेश घेऊन जाण्याची आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची वेळ निघून गेली आहे. आत्तापर्यंत जवळपास 5 कोटी लोकांनी मतदान करुनही झालंय. अर्ली व्होटिंगचं हे प्रमाण अभूतपूर्व आहे. त्यामुळे कुंपणावर बसून न राहता कोणाचे पाठिराखे किती प्रमाणात मतदान करतात, एवढ्यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. आता उरलेल्या दहा-बारा दिवसात, आपापल्या मतदारांना मतपेटीपर्यंत घेऊन जाण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न राहील.
2016 सालच्या निवडणुकीत निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना, तत्कालीन एफबीआय प्रमुख जेम्स कोमी यांनी केलेल्या एका घोषणेमुळे, तीन ते चार टक्के मतं फिरली आणि ती ट्रम्प यांच्या पारड्यात पडली. हिलरी क्लिंटन यांच्या पराभवातलं ते एक प्रमुख कारण ठरलं. यावेळी असं काही 'ऑक्टोबर सरप्राइज' येणार का? यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणुकीचा निकाल इलेक्टोरल कॉलेज पध्दतीमुळे ठरत असल्यानं, ससा आणि कासवाच्या या शर्यतीत कोण जिंकणार ही गोष्ट अजून गुलदस्त्यात आहे.