गेल्या काही दिवसांत लोकप्रिय झालेले टेलिग्राम हे सोशल मीडिया अॅप आता नव्या वादात सापडले आहे. याच्या वापरकर्त्यांमध्ये आपण शेअर करत असलेल्या मेसेज, फोटो आणि इतर फाईल्स यांच्याबाबत अधिक सुरक्षितता असल्याचा समज या आधी होता. आता याला तडा गेल्याचं दिसून आलंय. डिप फेक टूलच्या सहाय्याने टेलिग्रामवर शेअर करण्यात आलेल्या सामान्य फोटोंचेही कपडे उतरवून त्यांना शेअर करण्यात येत आहे अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासकरून तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना याचे लक्ष बनवण्यात येत असून त्याचा वापर त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी करण्यात येत आहे.
आतापर्यंत सुमारे एक लाखांवर महिलांचे न्यूड फोटो अल-बॉटच्या माध्यमातून ऑनलाईन शेअर करण्यात आले आहेत. शेअर करण्यात आलेले फोटो हे त्या महिलांच्या सोशल मीडियावरून घेण्यात आले आहेत. यात काही फोटो हे अल्पवयीन मुलींचेही असल्याचं लक्षात येतंय. ही धक्कादायक बाब डिप फेक टूलवर संशोधन करणाऱ्या सिक्युरिटी कंपनी सेन्सिटीच्या संशोधनातून उघड झाली आहे.
जुलै 2020 पर्यंत डिप फेकचा वापर करून 1,04,882 महिलांचे न्यूड फोटो तयार करून ते टेलिग्राम चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर टाकण्यात आले आहेत आणि या वापरकर्त्यात 70 टक्के लोक रशिया आणि आजूबाजूच्या देशातले आहेत तर काहीजन युरोपीय देशातील आहेत असे हे संशोधन सांगते.
हे नाव नसलेलं बॉट कृत्रीम बुध्दीमत्ता आणि मशिनच्या लर्निंगचा उपयोग करून टेलिग्रामच्या फोटोवर काम करतं आणि सामान्य फोटोंना न्यूड बनवतं.
डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला जातो?
डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक फेक व्हिडियो तयार केले जातात. यात आर्टिफिशेल इंटिलेजन्सचा म्हणजे कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर केला जातो. ज्यामध्ये लोकांनी एखादी कधीच न केलेली गोष्ट दाखवली जाते वा न बोललेलं वाक्य त्यांच्या तोंडी घातलं जातं. गेल्या काही वर्षात डिप फेकच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले असे अनेक व्हिडियो समोर आले आहेत जे जराही फेक न वाटता ओरिजीनल वाटतात. या पध्दतीने अनेक सेलिब्रेटींचे पॉर्न व्हिडियो तयार केल्याचं आणि त्या व्हायरल केल्याच्या घटना घडल्या आहेत.
अल-बॉट हे मोफत वापरता येते. सामान्यत: ते अर्ध न्यूड फोटो वितरित करते पण कोणी वापरकर्त्याने मागणी केली तर पैसे घेऊन पूर्ण न्यूड फोटो तयार करते.
यापासून बचाव करायचा असेल तर आपण आपल्या सोशल मीडियाच्या फ्रेंड लिस्टमध्ये अनोळखी माणसांना अॅड करू नये. तसेच ज्यात आपले खासगी फोटोंची मागणी केली जाते अशा सोशल मीडियावर चालणाऱ्या फेक कॅम्पेनमध्ये सामील होऊ नये.
फेसबुकवर असे अनेक अॅप आहेत जे आपण कोणत्या अभिनेता वा अभिनेत्रीप्रमाणे दिसतो, आपण मागील जन्मी कोण होतो, आपले भविष्य काय, किती पैसा कमावणार अशा प्रकारची माहिती देतात. खरे तर हे अॅप आपला डाटा चोरत असतात आणि भविष्यात त्याचा गैरवापर होऊ शकतो. अशा अॅप पासून आपण दूर राहिले पाहिजे.