Sri Lanka Declares State Of Emergency : श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोलमडल्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी कोलंबोसह संपूर्ण देशात हिंसाचार आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आणीबाणी जाहीर केली आहे. देशव्यापी कर्फ्यूचे उल्लंघन केल्याबद्दल आणि भीषण आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी रॅली आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल रविवारी श्रीलंकेत 600 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.


विरोधी पक्षातील नेते सजीथ प्रेमदासा यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी निषेध मोर्चा काढला होता. आंदोलनाचा पूर्वनियोजित कार्यक्रम लक्षात घेऊन सरकारने शनिवार आणि रविवारी कर्फ्यू जाहीर केला होता. परंतु, कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी  या मोर्चातील 600 पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे. 


 श्रीलंकेमधील 'कोलंबो गॅझेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, रविवारी पश्चिम प्रांतात 664 जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी प्रस्तावित 'अरब स्प्रिंग'-शैलीतील निषेधाच्या आधी देशव्यापी कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता.


राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा अधिसूचना जारी केली. त्यामध्ये श्रीलंकेत 1 एप्रिलपासून तत्काळ आणीबाणी लागू करण्यात आल्याचे जाहीर केले. सरकारने रविवारी इंटरनेट सेवेवर बंदी घालण्याचे आदेश दिले. शिवाय लोकांना एका ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घातली. दरम्यान, राजपक्षे यांचे पुतणे आणि क्रीडा मंत्री नमल राजपक्षे यांनी इंटरनेट सेवेवरील बंदी अयोग्य असल्याचे म्हटले आहे.  


श्रीलंकेतील जनता स्त्यावर उतरल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. जनता संतप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.


महत्वाच्या बातम्या