Fourth Wave of Coronavirus : जगभरात कोरोनाचा कहर पुन्हा वाढलेला पाहायला मिळतोय. चीनसह युरोपियन देशांमध्ये कोरोना पुन्हा डोकेवर काढू लागला आहे. अशात भारतात कोरोनाची चौथी लाट येणार अशी भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आयआयटी (IIT) कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे की, देशात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. अग्रवाल यांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसर्‍या लाटेसंदर्भातील सांगितलेले अंदाज खरे ठरले आहेत. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कोरोना विषाणूची गुणसूत्रीय रचनेत बदल झालेला पाहायला मिळाला.
 
कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मनिंद्र अग्रवाल यांचा दावा
प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत सांगितले आहे की, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार चौथी लहर येण्याची शक्यता नाही. तसेच जरी कोरोनाची चौथी लाट आली तरी, देशातील नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी दावा केला आहे की, कोरोनाची चौथी लाट तिसऱ्या लाटेप्रमाणे कमी कालावधीसाठी आणि कमी घातक असेल. त्यांनी पुढे सांगितले आहे की, 90 टक्क्यांहून अधिक भारतीयांमध्ये कोरोनाच्या विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती तयार झाली आहे. 


कोरोनाच्या उपप्रकाराबाबत सांगितली 'ही' बाब
त्यांनी सांगितले की, जर कोरोना विषाणूच्या उपप्रकारात बदल झाला तर परिस्थिती बदलू देखील शकते. प्राध्यापक अग्रवाल यांनी गणितीय सूत्राच्या आधारे कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा अंदाज मांडला होता. तसेच ओमायक्रॉन वेगाने पसरत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय ओमायक्रॉन प्रकारावर लसीचा प्रभाव नाही असेही आढळले होते. पण ओमायक्रॉन प्रकार नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मात देऊ शकला नाही. यामुळेच भारतातील केवळ 11.8 टक्के लोकांना ओमायक्रॉन संसर्ग झाला आहे. तर ग्रीसमध्ये 65.1 टक्के लोकांना ओमायक्रॉन प्रकाराची लागण झाली आहे. ज्या देशांतील लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली तिथे ओमायक्रॉनचा प्रसार कमी होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha