Embassy of India in Ukraine Advisory : युक्रेनमधील (Ukraine News) बिघडलेली परिस्थिती आणि नुकतंच झालेले हल्ले पाहता भारतीय दूतावासानं एक अॅडव्हायझरी (Advisory) जारी केली आहे. बुधवारी (19 ऑक्टोबर) भारतीय दूतावासानं (Embassy of India) अॅडव्हायझरी जारी करत युक्रेनमध्ये (Ukraine) न जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, जे नागरिक आधीपासूनच युक्रेनमध्ये आहेत. त्यांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. 






बुधवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनच्या चार भागांत मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा केली. हे भाग म्हणजे लुहान्स्क, डोनेस्तक, झापोरिझ्झ्या आणि खेरसन. या शहरांवर रशियानं बेकायदेशीरपणे ताबा मिळवला होता. मार्शल लॉ लागू करण्याच्या घोषणेनंतर, रशियाच्या सर्व प्रदेशांच्या प्रमुखांना अतिरिक्त आपत्कालीन अधिकार मिळाले आहेत.


पुतिन काय म्हणाले?


व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितलं की, मी रशियन फेडरेशनच्या या चार भागांमध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या हुकुमावर स्वाक्षरी केली आहे. त्यानंतर क्रेमलिननं एक हुकूम प्रकाशित केला की, गुरुवारच्या सुरुवातीपासून रशियाचा ताबा असलेल्या युक्रेनच्या प्रदेशांमध्ये मार्शल लॉ लागू केला जाईल.


रशियाचे युक्रेनवर हल्ले 


अलिकडे रशियाकडूनही युक्रेनवर हल्ले वाढले आहेत. सोमवारी (17 ऑक्टोबर) युक्रेनच्या अनेक शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले. युक्रेनच्या वतीनं ड्रोन हल्ल्यात एका गर्भवती महिलेसह सहा जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले. याआधी 10 ऑक्टोबर रोजी रशियाकडून युक्रेनमध्ये सुमारे 84 क्षेपणास्त्रं डागण्यात आली होती. या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.


रशियन सैन्य तळावर दहशतवादी हल्ला


काही दिवसांपूर्वी रशियाच्या सैन्य तळावर मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यात तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाले होते. एकीकडे रशिया आणि युक्रेनचा संघर्ष सुरु आहे. अशातच रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरु आहेत. चारही बाजूनं युक्रेनची कोंडी करण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे रशियन सैन्याच्या तळावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.