Elon Musk Terminate Twitter Deal : टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलंय. कंपनीने अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला आहे. एलॉन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी यासंंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केले आहेत. मस्क यांनी म्हटलं आहे की, 'ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts)  तपशील देण्यात अयशस्वी ठरली.'


सुरुवातीपासूनच ट्विटर डील चर्चेत


टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची ट्विटर डील सुरुवातीपासूनच चर्चेत होती. यावर्षी एप्रिलमध्ये एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सोबतच्या कराराची घोषणा केली होती. 54.20 डॉलर प्रति शेअर अनुसार 44 अब्ज डॉलरमध्ये हा करार होणार होता. पण आता एलॉन मस्क यांनी ही डील संपल्याचं सांगितलं आहे. या करारामध्ये सुरुवातीपासूनच अनेक अडथळे समोर आले होते. ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्या अनेक मतभेद होते. यामुळेच एलॉन मस्क यांनी याआधीही हा करार स्थगित केला होता.






ट्विटरकडून अटींचं उल्लंघन


एलॉन मस्क यांच्याकडून ट्विटर कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, 'एलॉन मस्क ट्विटरसोबतचा करार मोडत आहेत. ट्विटर कंपनी करारातील अनेक तरतुदींचं उल्लंघन करत आहे. याशिवाय मस्क यांनी मागील दोन महिन्यांमध्ये मागितले माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.' तसेच मस्क यांनी म्हटलं आहे की, 'ट्विटरने अनेक उच्च दर्जाचे अधिकारी आणि एचआर विभागातील कर्मचाऱ्यांना कमी केलं असून हेही अटींचं उल्लंघन आहे.'


जून महिन्यातही ट्विटर डील रद्द करण्याचा इशारा
एलॉन मस्क यांनी जून महिन्यातही ट्विटरसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की, कंपनी बनावट खात्यांचा डेटा लपवत आहे. योग्य डेटा न दिल्यास ते करार रद्द करतील, असं मस्क यांनी सांगितलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या