Japan Gun Laws : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची शुक्रवारी एका हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली आहे. एका निवडणुकीच्या कार्यक्रमादरम्यान भाषण करत असताना आबे यांच्यावर गोळी झाडण्यात आली. जपान हा जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. पण शिंजो आबे यांच्या हत्येचे हे प्रकरण धक्कादायक आहे.
जपानमध्ये बंदूक वापरण्यासाठी अत्यंत कडक कायदे आहेत. परंतु, आजच्या घटनेने जपान सरकारची चिंता वाढली असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जपानची लोकसंख्या 130 दशलक्ष आहे. देशाचा 'बंदूक नियंत्रण कायदा' इतका कडक आहे की, बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
जपानच्या फायर आर्म्स अॅक्टनुसार, देशात शॉटगन आणि एअर रायफल विकता येतात. परंतु, हँडगन विकणे बेकायदेशीर आहेत. त्यामुळे हॅंडगन घेण्यासाठी दीर्घ आणि कठीण प्रक्रियेतून जावे लागते. फायर आर्म्स परवाना मिळविण्यासाठी खरेदीदारांना अनेक चाचण्यांमध्ये पात्र व्हावे लागते. दिवसभर बंदुकीच्या सत्रात भाग घ्यावा लागतो. शिवाय लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. शूटिंग-श्रेणी चाचणी 95 टक्के अचूकतेसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. खरेदीदारांना मानसिक आरोग्य मूल्यमापन आणि औषध चाचणीतूनही जावे लागते. एवढेच नाही तर बंदूक खरेदी करणाऱ्यांची पार्श्वभूमीही तपासली जाते. यामध्ये त्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड, वैयक्तिक कर्ज, गुन्ह्यातील त्यांचा सहभाग, कुटुंब आणि मित्र यांच्याशी असलेल्या संबंधांच्या संपूर्ण तपशीलाचा समावेश असतो.
जपानमध्ये बंदूक परवाना मिळवणे कठीण
जपानमध्ये बंदूक परवाना मिळवण्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा वर्षातून तीन वेळा द्यावी लागते. डॉक्टरांच्या तपासणीनंतर प्रमाणपत्र दिले जाते. या प्रक्रियेत मानसिकदृष्ट्या निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. खरेदीदाराला अंमली पदार्थांच्या सेवनाचा कोणताही इतिहास नसने आवश्यक आहे. परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर परमिट मिळण्यास एक महिना लागतो. बंदूक खरेदी करणाऱ्यांनी मुलाखतीदरम्यान पोलिसांना हे सांगणेही खूप महत्त्वाचे आहे की, त्यांना बंदूक का हवी आहे?
एवढ्या दिव्य प्रक्रियेतून बंदूक मिळते. परंतु, बंदूक मिळाली की सर्व काही झाले असे होत नाही. तर बंदूक मिळाल्यानंतर खरेदीदाराने त्याच्या शस्त्राची पोलीस ठाण्यात नोंद करणे आवश्यक असते. त्याने आपली बंदूक आणि काडतुसे कोठे ठेवली आहेत याचा तपशील देखील पोलिसांना द्यावा लागतो. याशिवाय पोलिसांनी वर्षातून एकदा बंदुकीची तपासणी करणेही आवश्यक आहे. बंदुकीचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी तीन वर्षांनंतर पुन्हा त्याच प्रक्रियेतून जावे लागते.