अबुधाबीत दहा जणांना कोट्यवधींची लॉटरी, आठ भारतीयांचा समावेश
एबीपी माझा वेब टीम | 09 Oct 2017 07:39 PM (IST)
अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'बिग टिकीट ड्रॉ'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा यूएईमधला सगळ्यात मोठा लकी ड्रॉ मानला जातो.
अबुधाबी : अबुधाबीमध्ये आयोजित एका मेगा लकी ड्रॉमध्ये दहा जणांना लॉटरी लागली. विशेष म्हणजे विजेत्यांमध्ये आठ भारतीयांचा समावेश आहे. प्रत्येक विजेत्याला 1.78 कोटी रुपयांचं इनाम मिळणार आहे. अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'बिग टिकीट ड्रॉ'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा यूएईमधला सगळ्यात मोठा लकी ड्रॉ मानला जातो. विजेत्यांना दर महिन्याला रोख बक्षिसांशिवाय आलिशान गाड्या मिळतात. आठ भारतीय आणि दोन कॅनेडियन नागरिकांनी यावेळी हा ड्रॉ जिंकला. अभय कुमार कृष्णन यांना जेव्हा लॉटरी जिंकल्याचा फोन आला, तेव्हा त्यावर विश्वासच नव्हता बसला, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आयोजकांनी दुसऱ्यांदा फोन केल्यावर मला सुखद धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं. लॉटरीचं तिकीट मित्रासोबत भागिदारीत घेतल्यामुळे ते बक्षिसाची रक्कमही वाटून घेणार आहेत. तर उर्वरित रक्कम शिक्षणासाठी दान करणार आहेत.