मुंबई : जगातील सर्वात वजनदार महिलेवर मुंबईत शस्त्रक्रिया होणार आहे. 500 किलो वजनाची इमान अहमद वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेसाठी इजिप्तहून खास मुंबईत दाखल झाली आहे. इमान अहमद अब्दुलातीला विमानतळावरुन हलवण्यासाठी खास क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
मुंबईतल्या चर्नी रोडमधील सैफी हॉस्पिटलमध्ये इमानवर सर्जरी होणार आहे. प्रख्यात बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला हे वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करणार आहेत. शस्त्रक्रियेसाठी वन बेड हॉस्पिटल ही संकल्पना वापरण्यात आली. इमानच्या शस्त्रक्रियेसाठी 3 हजार स्क्वेअर फुटांची विशेष खोली बनवण्यात आली आहे.
इमानचा आकार लक्षात घेता या खोलीचा दरवाजा 7 बाय 7 फुटांचा करण्यात आला आहे. ही खोली बनवण्यासाठी सुमारे दोन कोटींच्या आसपास खर्च आला आहे. या खोलीत आयसीयू, डॉक्टर, अटेंडंटसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचीही सोय असेल.
पुढील सहा महिने या ठिकाणी इमानच्या लठ्ठपणावर उपचार होणार आहेत. 36 वर्षीय इमान वजनामुळे गेल्या 25 वर्षात घरातून एकदाही बाहेर पडली नव्हती.