नवी दिल्ली: भारतीय बँकाचं कोट्यवधी रुपयाचं कर्ज बुडवून इंग्लंडला पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारने युनायडेट किंग्डमला अधिकृत विनंती केली आहे. विजय मल्ल्यावर भारतात कर्ज बुडवेगिरीप्रकरणी खटला सुरु आहे. न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी मल्ल्याला समन्सही जारी करण्यात आलंय. मात्र तो देशाबाहेर असल्याने त्याला समन्स बजावता येत नाही. त्यामुळेच त्याला भारतात आणून त्याच्यावर खटला चालविण्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे. म्हणूनच भारत सरकारने विजय मल्ल्या याच्या हस्तांतरणासाठी इग्लंडला रितसर विनंती केलीय.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीबीआयने मल्ल्या याच्या हस्तांतरणासाठी भारत सरकारची अधिकृत विनंती ब्रिटनच्या भारतातील उच्चायुक्तांमार्फत पाठवली आहे.

भारत आणि इग्लंड यांच्यात हस्तांतरण करार झालेला आहे. तसंच भारतात मल्ल्यावर सुरू असलेल्या कर्ज बुडवेगिरीप्रकरणी सुरु असलेल्या खटल्यात पुरेसे सबळ पुरावे आहेत. त्यामुळेच त्याच्या हस्तांतरणाची विनंती करण्यात आली आहे. भारत-ब्रिटन द्वीपक्षीय सबंधाचा तसंच मुत्सद्देगिरीचाही मल्ल्याला भारतात आणताना कस लागणार आहे.

मल्ल्याला भारतात पाठविण्याची यापूर्वीची विनंती यूके सरकारने फेटाळल्यानंतर, सीबीआयने यावेळी परराष्ट्र मंत्रालयामार्फत नव्याने विनंती केली आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात विजय मल्ल्या यांनी भारतातून पलायन करुन इग्लंडमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला. त्यासाठी नोव्हेंबरमध्येच कोर्टामार्फत मल्ल्याला भारतात पाठविण्याची विनंती करण्यात आली होती.

मद्यसम्राट विजय मल्ल्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरन्टही जारी करण्यात आलं आहे.

विजय मल्ल्या याच्या किंगरफिशर एअरलाईन्स या विमान वाहतूक कंपनीने भारतीय बँकाचं 1300 कोटी रूपयाचं कर्ज थकवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी आयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनाही मल्ल्याला कर्ज देण्यासाठी नियमबाह्य मार्गाचा अवलंब केल्याबद्धल सहआरोपी करण्यात आलं आहे.