Earthquake in Mexico : मेक्सिकोतील (Mexico) बाजा कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर मंगळवारी 6.2 रिश्टर स्केलचा (Earthquake) भूकंप झाला. या बाबतची माहिती यूएस भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) ने दिली आहे. भूकंप होताच या ठिकाणी गोंधळ उडाला असून लोकं लगेच घरातून बाहेर पडले आणि रस्त्यावर आले. यूएसजीएसने म्हटलंय की, हा भूकंप बाजा कॅलिफोर्नियामधील लास ब्रिसासच्या पश्चिम-नैऋत्येस झाला. सुमारे 30 किमी (18.6 मैल) 19 किमी (12 मैल) खोलीवर हा भूकंप झाला. यापूर्वी या वर्षी सप्टेंबरमध्येही येथे भूकंपाचे धक्के जाणवले होते.


सोलोमन बेटांवरही भूकंप


प्रशांत महासागर क्षेत्रातील सोलोमन बेटांवर मंगळवारी सकाळी 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला. या भूकंपामुळे कोणतीही जीवित तसेच वित्तहानी झाल्याचे वृत्त नसले तरी त्याची तीव्रता पाहून लोक घाबरले. यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, मंगळवारी सकाळी 7.33 वाजता भूकंप झाला, ज्याचे केंद्र 10 किमी खोल होते.


इंडोनेशियातील भूकंपामुळे 162 लोकांचा मृत्यू


सोमवारी इंडोनेशियाच्या मुख्य बेट जावावर झालेल्या भूकंपामुळे 162 लोकांचा मृत्यू झाला, तर 700 हून अधिक लोक जखमी झाले. अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत. भूकंपामुळे झालेला विध्वंस पाहून लोक भीतीच्या दहशतीखाली जगत आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी होती. इंडोनेशियाच्या हवामानशास्त्र आणि जिओफिजिकल एजन्सीनुसार, भूकंपानंतर आणखी 25 झटके नोंदवले गेले. भूकंपाचा केंद्रबिंदू इंडोनेशियाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या प्रांतातील सियांजूर शहराजवळ होता. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. सोमवारी पहाटे इंडोनेशियाच्या आधी ग्रीसमधील क्रेट बेटावर भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6 इतकी होती. EMSC ने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू 80 किमी (49.71 मैल) च्या खोलीवर होता. 


भूकंप कसे होतात?
भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याच्या "भूकंप लहरी" तयार होतात. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे तसेच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.