Rectal Cancer Disappears In Drug Trial : कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यावरील नेमकं औषध अजूनही सापडलेलं नाही. पण रेक्टल कॅन्सरशी झुंज देत असलेल्या एका ग्रुपसोबत एक चमत्कार घडला आहे. प्रयोग म्हणून केलेल्या उपचारांमध्ये या रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊन त्यांना नवीन आयुष्य मिळालं. छोट्या प्रमाणात केलेल्या या वैद्यकीय चाचणीमध्ये 18 रुग्णांचा समावेश होता. या रुग्णांना सहा महिने डोस्टारलिमॅब (Dostarlimab) नावाचं औषध देण्यात आलं होतं. आश्चर्याची आणि आनंदाची बाब म्हणजे सहा महिन्यांनी या सगळ्यांचा कर्करोग पूर्णपणे बरा झाला. न्यूयॉर्क टाइम्सने (New York Times) याबाबतच वृत्त प्रकाशित केलं आहे.


Dosterlimumab हे एक औषध आहे जे प्रयोगशाळेत तयार केलेल्या रेणूंनी बनलेलं आहे, जे शरीरात अँटीबॉडीज म्हणून कार्य करतं. रेक्टल कॅन्सर असलेल्या सर्व 18 रुग्णांना हेच औषध देण्यात आलं. उपचाराचा परिणाम असा झाला की सहा महिन्यांनंतर, सर्व रुग्णांचा कर्करोग पूर्णपणे नाहीसा झाला होता जो एंडोस्कोपी, शारीरिक तपासणी, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी, पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन याद्वारे शोधला जाऊ शकत नव्हता, असं न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे. 


न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुईस ए. डायझ जे म्हणाले की, "कर्करोगाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं आहे."


क्लिनिकल चाचण्यांच्या निकालाने वैद्यकीय विश्वात आश्चर्य
क्लिनिकल ट्रायलमध्ये सामील झालेले रुग्ण याआधी कर्करोगापासून मुक्त होण्यासाठी केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया यासारखे दीर्घ आणि वेदनादायक उपचारांमधून जात होते. उपचारांच्या या पद्धती मूत्र आणि लैंगिक रोगांचे निमित्त ठरु शकतात. हा त्यांच्या उपचाराचा पुढचा टप्पा आहे असं समजून 18 रुग्ण चाचणीत सामील झाले होते. मात्र, आता पुढील उपचारांची गरज नसल्याचं कळल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. क्लिनिकल चाचण्यांच्या निकालांने वैद्यकीय जगाला आश्चर्यचकित केलं आहे.


कोणत्याही रुग्णावर दुष्परिणाम दिसले नाहीत
प्रसारमाध्यमांशी बोलताना, कॅलिफोर्निया विद्यापीठातील कोलोरेक्टल कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अॅलन पी. वेणुक म्हणाले की, सर्व रुग्ण पूर्ण बरे होणं हे 'अभूतपूर्व' आहे. हे संशोधन जागतिक दर्जाचे आहे, असं ते म्हणाले. तसंच हे औषध प्रभावी आहे कारण चाचणीत कोणत्याही रुग्णावर औषधाचे दुष्परिणाम झाले नाहीत किंवा जाणवले नाहीत. 


तर मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर आणि पेपरचे सह-लेखक, ऑन्कोलॉजिस्ट डॉ अँड्रिया सेर्सेक यांनी न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना त्या क्षणाचा उल्लेख केला जेव्हा रुग्णांना जेव्हा कळलं की त्यांचा कर्करोग पूर्ण बरा झाला आहे. "त्या सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते."


आशा वाढली, पण मोठ्या प्रमाणावर चाचणीची गरज
चाचणी दरम्यान, रुग्णांना सहा महिन्यांसाठी दर तीन आठवड्यांनी औषध देण्यात आलं. ते सर्व रुग्ण कर्करोगाच्या एकाच टप्प्यात होते. तो त्याच्या गुदाशयात वाढला होता पण तो इतर अवयवांमध्ये पसरलेला नव्हता. 


औषधाचं पुनरावलोकन करताना कर्करोग संशोधकांनी हे उपचार आशादायी दिसत असल्याचं म्हटलं. मात्र हे औषध आणखी रुग्णांसाठी प्रभावी आहे आणि कर्करोग खरंच पूर्णपणे बरा करु शकतं का याची खात्री करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या आवश्यक आहेत.