वॉशिंग्टन : सलग तिसऱ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवत पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपद काबीज केलंय.विजयासाठी 270 इलेक्टोरल व्होट्सची गरज असताना ट्रम्प यांनी 277 चा आकडा पार केलाय. ट्रम्प यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला. बहुमत गाठलेल्या ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांसमोर विजयी भाषण करत अमेरिकन मतदारांचे आभार मानले. आपण इतिहास घडवला, आता बेकायदा लोक अमेरिकेत येणार नाहीत अशी गर्जना ट्रम्प यांनी केली. 


इलॉन मस्क यांचंही ट्रम्प यांनी यावेळी आवर्जुन कौतुक करत हा नवा स्टार आहे असं म्हटलंय. जे डी व्हान्स अमेरिकेचे नवे उपाध्यक्ष असतील असं सांगत ट्रम्प यांनी यावेळी त्यांनाही बोलायला सांगितलं. विशेष म्हणजे ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला सिनेटच्या निवडणुकीतही बहुमत मिळालंय. रिपब्लिकन पार्टीला 51 तर कमला हॅरीस यांच्या डेमोक्रेटीक पार्टीला 42 जागा मिळाल्या आहेत. 


Why Donald Trump Won : डोनाल्ड ट्रम्प का जिंकले? 


ट्रम्प यांच्या विजयामागे अनेक कारणं आहेत आणि ही कारणं अमेरिकेच्या समाजाशी निगडित आहेत. नेमक्या कुठल्या बाबी ट्रम्प यांच्या पथ्यावर पडल्या आहेत आपण पाहुयात,


- भारताप्रमाणं अमेरिकेतही महागाई आणि रोजगाराची समस्या गंभीर आहे.


- रोजगार निर्मिती आणि महागाई कमी करणे यावरट्रम्प यांचा भर. 


- आपल्या समस्यांना अन्य देशातून आलेले स्थलांतरित जबाबदार आहेत असं अनेक अमेरिकन नागरिकांचं मत. 


- ट्रम्प यांनी या मताला खतपाणी घालत स्थलांतरितांची संख्या कमी करू असं जाहीर केलं.


- आयातीला विरोध, आयात उत्पादनांवर कर वाढवण्याची घोषणा मतदारांना पटली. 


- ट्रम्प यांची निर्णायक प्रतिमा, एकाधिकारशाहीची प्रवृत्ती अनेकांना भावते. 


- समलिंगी विवाह आणि तरुणींचा गर्भपात याला ट्रम्प यांचा विरोध आहे. त्यांच्या या मताशी कट्ट्रर विचारसरणीचे मतदार सहमत आहेत. 


- अमेरिकेनं अन्य देशांच्या भांडणांमध्ये पडण्याची अजिबात गरज नाही हे ट्रम्प यांचं धोरण लोकप्रिय झालं. 


Why Kamala Harris Lost : कमला हॅरिस का हरल्या? 


कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना तगडी लढत दिली हे मान्य केलं पाहिजे. प्रचारासाठी इतका कमी वेळ असूनही त्यांनी बऱ्यापैकी मजल मारली. त्या विजय मात्र खेचून आणू शकल्या नाहीत. हॅरिस यांच्या पराभवामागची कारणं कुठली त्यावरही नजर टाकुयात. 


- ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांसमोर हॅरिस यांची आश्वासनं टिकली नाहीत. 


- महागाई, बेरोजगारी, शस्त्र संस्कृतीबाबत त्यांची आश्वासनं पोकळ वाटली. 


- बेकायदेशीर स्थलांतरावर कारवाईबद्दल हॅरिस गंभीर नाहीत असं अनेकांचं मत. 


- कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास अमेरिकन समाज तयार नाही असाही एक मतप्रवाह.


- बायडेन यांनी खूप उशिरा माघार घेतल्यामुळे प्रचाराला तितकासा वेळ मिळाला नाही. 


- बायडेन यांच्या वृद्धापकाळानं गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा डेमॉक्रॅट्सना टोमणे ऐकावे लागले. त्याचा देखील फटका बसला. 


ही फोटो गॅलरी पाहा :