अमेरिकेत येत्या दोन दिवसांत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात मतदानाची लगबग सुरु आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात असलेले दोन्ही उमेदवारही मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या अशाच एका सभेचे आयोजन पश्चिम अमेरिकेच्या नेव्हाडा राज्यात करण्यात आले होते.
यावेळी एका संशयित व्यक्तीच्या हलचाली दिसल्याने एकच गोंधळ उडला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी वेळीच ट्रम्प यांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवले, तर त्या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं. मात्र, या व्यक्तीची झडती घेतली असता, कोणतेही शस्त्रास्त्र मिळाले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अलकायदाने या निवडणूक प्रक्रियेदरम्यान दहशतवादी हल्ल्याचा कट रचला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वत्र सुरक्ष यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनीही याला दुजोरा दिला असून, सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असल्याचे कैरोलिनामध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.