राष्ट्रकुल स्पर्धा : पैलवान रेश्माला सुवर्ण, सोनालीला रौप्यपदक
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2016 03:51 PM (IST)
सिंगापूर : राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या दोन महिला कुस्तीपटूंनी पदकांची कमाई केली आहे. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही कुस्तीपटू महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील पैलवान रेश्मा माने आणि पैलवान सोनाली तोडकर या महाराष्ट्राच्या लेकींनी सिंगापूरमधील राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं मिळवली आहेत. पैलवान रेश्मा माने हीनं महिलांच्या 63 किलो वजनी गटात सुवर्णपदक कमावलं आहे. रेश्मानं या स्पर्धेत सिंगापूरच्या चर्मायनी हुगीटिव्हाना आणि भारताच्याच गार्गी यादवला मात देत सुवर्णपदकावर आपलं नाव नोंदवलं. सिंगापूरमधील राष्ट्रकुल स्पर्धेत महाराष्ट्राच्याच सोनाली तोडकरनं 58 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सोनालीला भारताच्या मंजूकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे सोनालीला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. मूळची बीडची असलेली सोनाली पुण्यातील राजगुरुनगरमध्ये अश्विनी बोऱ्हाडे यांच्याकडे सराव करते, तर कोल्हापूरची रेश्मा माने राष्ट्रकुल कुस्ती संकुलात सराव करते. या दोघींच्या घवघवीत यशामुळे भारताच्या पारड्यात पहिल्याच दिवशी दोन पदकं पडली आहेत.