वॉशिंगटन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निमंत्रण धुडकावलं आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ट्रम्प यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास ट्रम्प यांच्यावतीने नकार देण्यात आल्याचं कळतं.


अमेरिकेने नुकतंच या संदर्भात भारतीय अधिकाऱ्यांना एक पत्र सोपवलं आहे. या पत्रात ट्रम्प यांनी येऊ न शकल्याने खेद व्यक्त केला आहे. अमेरिकेतील काही राजकीय कार्यक्रम आणि स्टेट ऑफ यूनियनमधील ट्रम्प यांचं संबोधन, 26 जानेवारीच्या काही दिवस आधी किंवा नंतर होणार आहे. या कारणामुळे ट्रम्प यांनी मोदी सरकारचं आमंत्रण नाकारल्याचं सांगितलं जात आहे.

भारताने रशियासोबत शस्त्रास्त्र खरेदी केल्याने आणि इराणमधून तेलाची आयात सुरुच ठेवल्याने अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. त्यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आला आहे.

अमेरिकेच्या काऊंटरिंग अमेरिकाज एडवर्सरीज थ्रू सँक्शंस अॅक्ट (CAATSA)अंतर्गत बंदीची धमकी दिल्यानंतरही भारताने रशियासोबत S-400 करार केला आहे. या करारापूर्वी ट्रम्प 26 जानेवारीला भारतात येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु करारानंतर अमेरिकेची भूमिका पाहता, हा दौरा रद्द होऊ शकतो, असे कयासही बांधले जात होते.

"डोनाल्ड ट्रम्प प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात जाणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही," असं व्हाईट हाऊसकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 च्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी डोनाल्ड ट्रम्प यांना हे निमंत्रण दिलं होतं.

दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तरीही "अध्यक्ष ट्रम्प यांच्या दौऱ्यासंदर्भात अधिकृत माहिती व्हाईट हाऊसमधूनच येईल," असं अमेरिकेतील भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वी 2015 मध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या व्यस्त कामांमधून वेळ काढून भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.

भारतात दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध देशाच्या प्रमुखांना आमंत्रण देण्याची परंपरा आहे. 2015 मध्ये बराक ओबामा, 2016 मध्ये फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद, 2017 मध्ये अबू धाबीचे युवराज मोहम्मद बिन जायद अल नाहयान आणि 2018 मध्ये आसियान अर्थात आग्नेश आशियातील दहा देशांचे प्रमुख प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.