Donald Trump Indictment: अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर 2016 मध्ये पॉर्न स्टार डॅनियल स्टॉर्मला बेकायदेशीररित्या पैसे दिल्याच्या आरोपांमुळे खटला सुरू आहे. अशातच याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. खटल्यासंदर्भात सुनावणीला सामोरं जाण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. अशातच, मंगळवारी (4 एप्रिल) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅनहॅटन कोर्टात हजर राहू शकतात. गेल्या आठवड्यातच ज्युरींनी माजी राष्ट्रपतींवर आरोप निश्चित केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला अवैधरित्या पैसे दिले होते, असा आरोप आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
खटल्यात न्यायालयात हजर राहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प फ्लोरिडामधील मॉर-ए-लागो येथील त्यांच्या निवासस्थानावरून न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. ते मॅनहॅटनमधील ट्रम्प टॉवरच्या 5 अव्हेन्यू येथे राहतील. ट्रम्प टॉवरच्या आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक तिथे आधीच पोहोचले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना गाडीतून उतरताना पाहून समर्थकांनी इमारतीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना अडवलं.
कोर्टात काय होणार?
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी सांगितलं आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रकरणी आपली बाजू मांडतील. मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील आरोप मंगळवारी आरोपपत्राच्या संक्षिप्त कार्यवाहीमध्ये वाचले जातील. ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं होतं की, ते न्यायालयात हजर होतील. ते म्हणाले होते की, "तुम्ही विश्वास ठेवा किंना नका ठेवू, मी कोर्टात जाणार आहे. अमेरिकेत असं घडायला नको होतं." कोर्टात हजर झाल्यानंतर ट्रम्प फ्लोरिडाला परतणार आहेत. येथे मार-ए-लागो येथील पाम बीचवर, डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी रात्री त्यांच्या समर्थकांना संबोधित करतील.
आरोपानंतर ट्रम्प यांना वाढता पाठिंबा
एकीकडे स्टॉर्मी डॅनियल्सला पैसे देण्याच्या प्रकरणात ट्रम्प यांच्या अडचणी वाढत आहेत, तर ट्रम्प आणि त्यांची टीम आपल्या समर्थकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. ट्रम्प यांच्या टीमचं म्हणणं आहे की, माजी राष्ट्राध्यक्षांना विनाकारण या प्रकरणात गोवलं जात आहे. ट्रम्प यांच्या प्रचार पथकानं एक मेल जारी केला आहे. त्या मेलचं शीर्षक आहे, 'आई विल बी अरेस्टेड टुमॉरो' (मला उद्या अटक केली जाईल.) या मेलमध्ये म्हटलंय की, "आपल्या देशाच्या इतिहासातील सर्वात लज्जास्पद विच हंटमुळे मला उद्या अटक केली जाईल यावर विश्वास ठेवणे कठीण आहे."
ट्रम्प यांच्या टीमचा दावा आहे की, आरोप लावल्यानंतर 24 तासांच्या आत त्यांनी 4 दशलक्ष US डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीच्या शर्यतीत ट्रम्प यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आहे. रॉयटर्स/इप्सॉस पोलमध्ये, 48 टक्के अमेरिकन रिपब्लिकन उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना प्राधान्य देतात. गेल्या महिन्यात हेच प्रमाण 44 टक्के होतं.
प्रकरण नेमकं काय?
2016च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याची माहिती मिळत आहे. हे प्रकरण एडल्ट फिल्म स्टारशी संबंधित आहे. ट्रम्प यांचे स्टॉर्मी डॅनियल्ससोबत अफेअर असल्याचा आरोप आहे आणि ही माहिती लपवण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये डॅनियल्सला 1,30,000 डॉलर दिल्याचा आरोप आहे. मात्र, येथे मुद्दा पैसे देण्याचा नसून कोणत्या माध्यमातून पैसे देण्यात आले आहे त्यासंदर्भात आहे. त्याचबरोबर ट्रम्प यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
असा आरोप आहे की, ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी गुप्तपणे डॅनियल्सला पैसे दिले आणि नंतर हे पैसे ट्रम्प यांच्या एका कंपनीने वकीलांना दिले. त्यानंतर ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना या काळात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरू झाली. ट्रम्प हे 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.