Saint Petersburg Blast: सेंट पिट्सबर्गमधील एका कॅफे बारमध्ये झालेल्या एका बॉम्ब धमाक्यात रशियाचा प्रसिद्ध ब्लॉगर ब्लादलेन तार्तास्की  (Military Blogger Vladlen Tatarsky) याचा मृत्यू झाला आहे. त्याससोबत या हल्ल्यामध्ये इतर 25 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे युक्रेनचा हात असून एका महिलेच्या माध्यमातून हा बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आरोप रशियाने केला आहे. बॉम्ब ठेवणारी ही महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून तिला अटक करण्यात आल्याची माहिती रशियाने दिली आहे. ब्लादलेन तार्तास्की हा रशियातील प्रसिद्ध ब्लॉगर असून रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन तो त्याच्या लिखानातून करत होता. 


रविवारी झालेल्या या हल्ल्यामध्ये ब्लादलेन तार्तास्की याचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर रशियाने संबंधित महिलेला अटक केली असून तिचा व्हिडीओ सार्वजनिक केला आहे. 


ब्लादलेन तार्तास्की हा या कॅफे बारमध्ये गेल्यानंतर लगेच ही महिला एक बॉक्स घेऊन त्या ठिकाणी गेली आणि त्यानंतर ब्लास्ट झाला. ब्लादलेन तार्तास्की हा एका छोट्या इव्हेंटसाठी त्या ठिकाणी गेला होता आणि काही महत्त्वाच्या लोकांशी त्याच्या भेटीगाठी होणार होत्या. 


या ब्लास्टनंतर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. 


दरम्यान, हा हल्ला युक्रेनने केल्याचा आरोप रशियाने केला आहे. रशियाचे आरोप युक्रेनने नाकारले असून हे रशियातील अंतर्गत दहशतवादी कृत्य असल्याचं सांगितलं आहे. 


 






या ब्लॉगरच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 26 वर्षीय रशियन महिला दरया ट्रेपोव्हाचा (Darya Trepova) एक व्हिडीओ रशियाने सार्वजनिक केला आहे. या महिलेने हा बॉम्ब हल्ला आपणच केल्याचं कबुल केल्याचं दिसतंय. या महिलेने ब्लादलेन तार्तास्कीच्या हत्येची जबाबदारी घेत आहोत असं या व्हिडीओत म्हटलंय. परंतु रशियन मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं आहे की, दरया ट्रेपोव्हाचा (Darya Trepova) हिने तपास एजन्सीला सांगितलं होतं की त्या बॉक्समध्ये काय आहे हे तिला माहिती नव्हतं.