मुंबई : पिझ्झाची सामान्य भारतीयांना ओळख करून दिली ती डॉमिनोजने असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पिझ्झा बनवणारा हा जगातला मोठा ब्रँड आहे. ऑर्डर केल्यानंतर अर्ध्या तासात घरपोच पिझ्झा आला नाही तर मोफत पिझ्झा किंवा एकावर एक पिझ्झा फ्री अशा आकर्षक जाहिरातीमुळे कायमच चर्चेत राहिले आहे. आता देखील डॉमिनोजने आपल्या 60 व्या अॅनीव्हर्सरीनिमित्त एका ऑस्ट्रेलियन दाम्पत्याला पुढील  60 वर्ष पिझ्झा फ्री दिला आहे.


डॉमिनोजने आपल्या 60 व्या अॅनीव्हर्सरीनिमित्त एका स्पर्धेचे आयोजन केले होते. डॉमिनोज ज्या दिवशी सुरू झाले अर्थात 9 डिसेंबरला जन्माला येणाऱ्या बाळाला डॉमिनोजने सुचवलेले नाव द्यायचे त्यानंतर पुढील 60 वर्षे पिझ्झा फ्री मिळणार अशी ती स्पर्धा होती. त्यासाठी एकच अट होती ती म्हणजे बाळ 9 डिसेंबरला जन्माला आले पाहिजे.


या स्पर्धेमध्ये जगातील अनेक नागरिक सहभागी झाले होती. या स्पर्धेमध्ये सिडनीत राहणारं दाम्पत्य क्लेमेंट ओल्डफिल्ड आणि अँथोनी लॉट हे विजेते ठरले आहे. प्रत्येक महिन्याला 14 डॉलरचा एक पिझ्झा पुढची 60 वर्ष या कुटुंबाला मोफत मिळणार आहे. या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव 'डॉमनिक' असे ठेवले आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर क्लेमेंट ओल्डफिल्ड आणि अँथोनी लॉट म्हणाले, हा निव्वळ योगायोग आहे. आम्ही स्पर्धेपूर्वीच आमच्या मुलाचे डॉमनिक ठेवण्याचे ठरवले होते.


डॉमिनोजने स्पर्धेचा विजेता जाहीर करताना सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली. या पोस्टमध्ये ते म्हणाले, "3.907 किलो म्हणजे अंदाजे 23 गार्लिक ब्रेड इतकं वजन असणारा आमच्या स्पर्धेचा विजेता आहे."





डॉमिनिकचा जन्म सिडनी रॉयल प्रिन्स अल्फ्रेड रूग्णालयात 9 डिसेंबरला मध्यरात्री 1.47 वाजता झाला. स्वीस इंटरनेट सर्व्हिसने देखील अशाच एका स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये त्यांनी 18 वर्षे फ्री इंटरनेट सेवा दिली.