मुंबई : जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी कोण विराजमान होणार? बराक ओबामांची जागा कोण घेणार? हिलरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रम्प? याविषयची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी 8 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीचं स्वरूप काय आहे आणि त्यात काय पणाला लागलं आहे, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून...

वर्णद्वेषाचे आरोप, भांडलवदारांशी जवळीक, महिलांविषयी असभ्य टिप्पणी, ईमेल स्कँडल इत्यादी इत्यादी... यंदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं हे चित्रं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या उमेदवारांमधल्या चढाओढीनं महासत्तेची काळी बाजूच समोर आणली आहे.

आधुनिक जगातल्या सर्वात ताकदवान लोकशाहीच्या सिंहासनासाठी ही चढाओढ, व्हाईट हाऊसची सत्ता मिळवण्यासाठीची शर्यत आता अंतिम टप्प्यावर पोहोचली आहे.

हिलरी यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक महिला राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे तर दुसरीकडे राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या ट्रम्पनाही मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. या दोघांशिवाय अन्य काही छोट्या पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारही या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण त्यांना फारसा प्रतिसाद मिळण्याची चिन्हं नाहीत.

कशी होईल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड?

8 नोव्हेंबर रोजी म्हणजे येत्या मंगळवारी अमेरिकेच्या 50 राज्यांतील सुमारे 12 कोटी मतदार मतदान करतील. तर निवडणुकीचा निकाल भारतीय वेळेनुसार 9 नोव्हेंबरला सकाळपर्यंत हाती येईल. सध्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेलसह अनेकांनी आधीच मतदानाचा हक्क बजावला आहे.

भारतात आपण मतदान करतो, तेव्हा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतो. पण अमेरिकेत मतदानाची पद्धत थोडी वेगळी आहे. तिथे मतदार थेट उमेदवारासाठी नाही तर प्रतिनिधी म्हणजे इलेक्टर्स निवडण्यासाठी मत देतात.

प्रत्येक राज्यातील इलेक्टर्सची संख्या ही त्या राज्यातून अमेरिकेच्या संसदेत निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या संख्येएवढी असते. अशा प्रतिनिधींची सभा म्हणजेच इलेक्टोरल कॉलेज.

अमेरिकेतील 50 पैकी 48 राज्यांतील नियमांनुसार त्या राज्यात सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या पक्षालाच राज्यातील सर्व इलेक्टर्सचा पाठिंबा मिळतो.

अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण 538 इलेक्टर्स आहेत. त्यापैकी 270 जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षपदी निवडून येईल.

दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली, तर त्यातून एकाची निवड करण्याचा अधिकार अमेरिकेची संसद म्हणजे काँग्रेसकडे आहे.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसोबतच अमेरिकेच्या संसदेतील जागांसाठी, तसंच काही राज्यांत गव्हर्नरपदासाठी आणि स्थानिक पातळीवरील निवडणुकाही एकाच दिवशी होणार आहेत.

पण सगळ्या जगाचं लक्ष आहे ते राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीकडे. आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीमुळं ही निवडणूक जणू बदनाम झाली आहे. तसंच, जगासमोरच्या संकटांचा सामना करू शकेल, असं कणखर नेतृत्त्व हिलरी किंवा ट्रम्प असं नेतृत्त्व देऊ शकतील का? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.