COVID-19 pandemic : मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. या काळात जगभरात 80 लाख टन प्लॅस्टिक कचरा निर्माण झाल्याचं एका संशोधनात समोर आलं आहे. यामधील 25 हजार टन पेक्षा जास्त कचरा समुद्रात गेलाय. ‘प्रोसिडिंग्स ऑफ दी नॅशनल अकेडमी ऑफ सायंसेज' यामध्ये कोरोनामुळे तयार झालेल्या प्लॅस्टिक कचऱ्यावरील संशोधन प्रसारित करण्यात आलेय. या संशोधनात असं म्हटलेय की, पुढील तीन ते चार वर्षांत प्लॅस्टिक कचऱ्याचा एक स्तर लाटेंच्या माध्यमांतून समुद्र किनाऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या कचऱ्याचा काही भाग खुल्या समुद्रात गेला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे हा कचरा आर्कटिक महासागरात एका ठिकाणी जमा होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे.
कोरोनात प्लॅस्टिकचा वापर वाढला –कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची संख्या वाढली होती. यात फेस मास्क, ग्लोज आणि फेस शील्ड यासारख्या एकदाच वापरत येणाऱ्या प्लॅस्टिकच्या साधनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळेच तयार होणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यात वाढ झाली. हा कचरा नदी आणि समुद्रात गेला. आधीपासून जागतिक स्तरावर प्लॅस्टिकचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता, त्यात आता आणखी वाढ झाली आहे. चीनमध्ये नानजिंग विद्यापीठ आणि अमेरिकेतील सॅन डिएगोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वात जमीनीतून निघणाऱ्या प्लॅस्टिकवर महामारीचा प्रभाव मोजण्यासाठी एक नवीन प्लॅस्टिक संख्यात्मक मॉडेलचा उपयोग केला. सर्वाधिक कचरा आशियातून –या संख्यात्मक मॉडेलच्या आधारावर 2020 मध्ये महामारीच्या सुरुवातीपासून ऑगस्ट 2021 पर्यंत प्लॅस्टिकचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये असं समोर आलेय की, समुद्रात जाणारा सर्वाधिक प्लॅस्टिक कचरा आशियातून येतोय. यातील सर्वाधिक कचरा रुग्णालयाचा आहे. विकसनशील देशात वैद्यकीय कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. रुग्णालयातील कचऱ्यानं टेन्शन वाढवलं -ज्यावेळी प्लॅस्टिक कचऱ्यांबाबात माहिती जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर आश्चर्यचकित झालो. कारण, वैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण वैयक्तिक वापरला जाणाऱ्या कचऱ्यांपेक्षा जास्त होतं. हा कचरा आशियातील देशातून सर्वाधिक येत असल्याचेही समोर आलं, असं संशोधन करणारे प्राध्यपाक आणि लेखक अमीना शार्टुप यांनी म्हटलेय. 73 टक्के कचरा आशियातील नद्यातून –आशियातील नद्यांमधून तब्बल 73 टक्के प्लॅस्टिक कचरा येत असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. शत अल-अरब, सिंधु आणि यांग्त्जी या तीन मोठ्या नद्यांचा मोठा वाटा आहे. या नद्या अरबी समुद्रात आणि पूर्व चीन समुद्राला मिळतात. युरोपमधील नद्यांमधून 11 टक्के कचरा समुद्रात जातो, असं संशोधनातून समोर आलं आहे.