वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अशातच अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिएटलमध्ये राहणाऱ्या मायकेल फ्लोरने कोरोनाशी 62 दिवस लढाई करून या आजाराचा पराभव केला, पण त्यानंतर जे घडले ते मायकेलसाठी धक्कादायक होते.


कोरोनाविरुद्ध यशस्वी झुंज दिल्यानंतर 62 दिवस रूग्णालयात राहून मायकेलला सोडण्यात आल्यावर त्याला 181 पानांचे 8.35 कोटी रुपयांचे बिल देण्यात आले. मायकेल यांना 04 मार्चला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 5 मे रोजी मायकलला रुग्णालयातून सोडण्यात आले.


मायकेलने सिएटलला दिलेल्या एका वृत्तपत्राला सांगितले की, रुग्णालयाने आयसीयूचा दररोज सुमारे 7.39 लाख रुपये आकारले. त्याचबरोबर निर्जंतुकीकरण कक्षात ठेवण्यासाठी मायकेलकडून 62 दिवसांचे तब्बल 3 कोटी 10 लाख रुपये घेतले गेले. या व्यतिरिक्त रुग्णालयाने मायकेलला 29 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यासाठी 62 लाख 28 हजार रुपये शुल्क आकारले.


वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार मायकेला यांचा आरोग्यविमा आहे. तसंच त्या अंतर्गत बहुतांश रक्कम ही त्यांना द्यावी लागणार नाही. दरम्यान, करोनाला मात्र देऊन प्रकृती उत्तम झाली असली तरी बील पाहून आपल्याला मोठं आश्चर्य वाटत असल्याचंही मायकेल म्हणाले. अमेरिकेतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अमेरिकेच्या सरकारने रुग्णालयांना 10 कोटी डॉलर्सची मदत जाहीर केली आहे.


कोरोनाचा सर्वाधिक कहर अमेरिकेत पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये जवळपास 22 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर एक लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परंतु, आता दरदिवशी ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद करण्यात येत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतात कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे.


Top 100 | देशभरातील महत्वाचे शंभर अपडेट्स एका क्लिकवर