मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे संपूर्ण जग जेरीस आलं आहे. अशातच अनेक देश या महामारीपासून बाहेर पडण्यासाठी व्हायरसवर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक दिवस-रात्र एक करुन लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातच अमेरिकेतील मॉडर्ना या औषध बनवणाऱ्या कंपनीच्या दाव्यामुळे लसीबाबतची अपेक्षा वाढवली आहे.
लस बनवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पार केल्याचं कंपनीने म्हटलं आहे. लसीची मानवी चाचणी सुरु केली असून त्याचे परिणाम उत्तम मिळल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ह्यूमन क्लीनिकल ट्रायलचे सुरुवातीचे निकाल सकारात्मक आल्यानंतर आता जुलै महिन्यात लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा सुरु होईल.
जर तिसरा टप्पाही यशस्वी ठरला तर कंपनी लस बनवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करु शकते. आरएनए आधारित लसीची मानवी चाचणी घेणारी मॉडर्ना ही पहिलीच औषध कंपनी आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही वर्षअखेरीस कोरोनाची लस येईल, असं म्हटलं आहे.
या लसीचं नाव आहे mRNA-1273. कंपनीचा दावा आहे की mRNA-1273 च्या क्लिनिकल ट्रायलमध्ये अनेक लोकांवर लसीची चाचणी घेण्यात आली. ज्यात 8 रुग्णांच्या शरीरात चाचणीदरम्यान कोरोनाला रोखणारी अँटीबॉडी बनली. ज्याचं प्रमाण हे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात असलेल्या अँटीबॉडीएवढंच किंवा त्यापेक्षा जास्त होता. ही अँटीबॉडी किंवा इम्यून रिस्पॉन्स कोरोनाला रोखू शकते हे आम्ही सिद्ध केलं आहे, असं मॉडर्ना कंपनीचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉ. ताल जक्स यांनी सांगितलं.
हा दावा mRNA-1273 च्या तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या फेरीत झालेल्या चाचणीनंतरचा आहे. कोणतीही लस तयार होण्यासाठी किमान सहा टप्पे पार करावे लागतात.
* पहिला टप्पा - संशोधन
* दुसरी टप्पा - प्री क्लिनिकल ट्रायल म्हणजे जनावरांवर चाचणी
* तिसरी टप्पा - यामध्ये मानवावर चाचणी केली जाते. त्याचेही तीन टप्पे आहेत
- 1. पहिली फेरी - 100 पेक्षा कमी माणसांवर चाचणी
- 2. दुसरा फेरी - शेकडो लोकांवर चाचणी
- 3. तिसरा फेरी - हजारो लोकांवर चाचणी
* चौथा टप्पा - औषधाला संबंधित विभागांकडून मंजुरी
* पाचवा टप्पा - उत्पादन
* सहावा टप्पा - गुणवत्ता नियंत्रण
जानेवारीपासून लसीवर संशोधन सुरु
मॉडर्ना कंपनी जानेवारी महिन्यापासून या लसीवर संशोधन करत आहे. यासाठी लसीसाठी कंपनीने आवश्यक जेनेटिक कोड मिळवले आणि त्यानंतर माणसांवर चाचणी करण्याचा कालावधी फारच कमी दिवसात पूर्ण केला. या मानवी चाचणीसाठी ज्या 45 जणांवर परीक्षण करण्यात आलं होतं त्यांना औषधाची मात्रा देण्यात आली. या औषधाद्वारे कोरोनाविरुद्ध लढण्याची त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली दिसली. त्याच आधारावर या लसीचा मनुष्यावरील वापर सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.
लसीचे किरकोळ दुष्परिणाम, मात्र गंभीर नाही
ज्याप्रकारे कोणत्याही सामान्य लसीचे काही दुष्परिणाम असतात, तशाच प्रकारचे दुष्परिणाम कोरोनाच्या ट्रायल वॅक्सिनचेही होते. परंतु हे फारसे गंभीर नाहीत. ही सामान्य लक्षणं होती, जसं इंजेक्शन दिल्यानंतर आजूबाजूची त्वचा लाल होते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
अमेरिकेची राष्ट्रीय आरोग्य संस्था आणि मॉडर्ना कंपनी संयुक्तरित्या mRNA-1273 बनवत आहे. परंतु अमेरिकेसह जगभरातील तीन देशांमध्ये लस बनवणारे आठ प्रबळ दावेदार आहेत. हे देश म्हणजे अमेरिका, ब्रिटन आणि चीन.
अमेरिकेत मॉडर्ना, Pfizer आणि Inovio लस बनवण्यासाठी संशोधन करत आहेत.
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना व्हायरसच्या लसीवर संशोधन सुरु आहे.
तर चीनमध्ये चार ठिकाणी लसीची चाचणी सुरु आहे.
आतापर्यंत सर्वात प्रबळ दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मॉडर्नाला लसीच्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगीही दिली आहे.