नवी दिल्ली : संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने इशारा दिला आहे. आफ्रिका, पूर्व युरोप, लॅटीन अमेरिका आणि आशियामधील काही देशांमध्ये कोरोनाचा वाढणारा आकडा चिंताजनक असल्याचं मत डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी व्यक्त केलं आहे. तसेच युरोपीय देशांमध्ये शिथील करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत बोलताना ते म्हणाले की, 'कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ आहे.'
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले की, 'या देशांमध्ये टेस्टिंग कपॅसिटी फार कमी आहे. ज्यामुळे मृतांचा आणि कोरोनाची बाधा झालेल्यांचा योग्य आकडा समजणं कठिण आहे. WHO ने इबोला व्हायरस दरम्यान, वॅक्सिन तयार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि असचं आम्ही कोविड-19च्या बाबतीत करणार आहोत. पुढे बोलताना ते म्हणाले की, याआधीही आम्ही आणि आमच्या सहकाऱ्यांनी कोविड-19साठी औषध तयार केलं आहे.
'कोरोनामुळे निर्माण होणारे इतर गंभीर आजार आणि मृत्यूचा लहान मुलांना तुलनेने कमी धोका आहे. पण इतर रोगांचा जास्त धोका असू शकतो ज्यास लसीद्वारे रोखता येऊ शकते,' अशी महिती टेड्रोस यांनी दिली आहे. योग्य वेळी लसीकरण न केल्याने जगभरातील जवळपास 1 कोटी 30 लाख लोकांना पोलिओ, कावीळ, कॉलरा, गोवरसारख्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशांच्या सीमा बंद करण्यात आल्या असून वाहतुकदेखील बंद आहे. यामुळे जवळपास 21 देशांमध्ये इतर आजारांच्या लसींची कमतरता निर्माण झाली असल्याचं ट्रेड्रोस यांनी सांगितलं आहे. 'आफ्रिकेत मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. हे असं होणं फार गंभीर आहे. आम्ही मदत करण्यासाठी काही देशांच्या संपर्कात आहोत,' असंही त्यांनी सांगितलं आहे. कोरोनाचा परिणाम मलेरियासंबंधी आरोग्य सेवेवर झाला असल्याचं ते म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या :
55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश
मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल केलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भिवंडीत रुग्णालयाबाहेर फिरताना आढळला!