भिवंडी : मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल झालेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भिवंडीतील रुग्णालयाबाहेर फिरताना आढळला. याप्रकरणी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड 19 रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन चौकशी करण्याची विनंती केली आहे. परंतु हा पॉझिटिव्ह रुग्ण नायर रुग्णालयात दाखल असताना बाहेर आलाच कसा आणि त्याला भिवंडीपर्यंत कोणी आणलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या प्रकारानंतर रुग्णालयाजवळच्या महापालिका कर्मचारी वसाहतीमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.


भिवंडी शहरात 51 वर्षीय किडनीच्या विकाराने त्रस्त रुग्ण खाजगी लॅबच्या अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. यानंतर त्याला महापालिका आरोग्य विभागाच्या पथकाने स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड 19 या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र या रुग्णाला डायलिसिस आवश्यक असल्याने त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात रवाना केलं. यावेळी रुग्णाची भाचीही त्याच्यासोबत नायर रुग्णालयात गेल्याने तिलाही क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.


मात्र त्यानंतर हा रुग्ण भिवंडतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड 19 रुग्णालय आणि जवळच्या कर्मचारी वसाहत परिसरात सुमारे पाऊण तास घुटमळताना दिसला. यावेळी रहिवाशांना तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याबद्दल खात्री पटली असता त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली. यानंतर डॉक्टरांनी बाहेर येऊन पाहिलं असता तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचं ओळखलं. यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेतून त्याची रवानगी पुन्हा स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड 19 रुग्णालयात केली. या घटनेचे मोबाईल व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.


यानंतर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोविड 19 रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलं असून इमारतीच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने रुग्णांना रुग्णवाहिकेतून आणले जात आहे. तसंच रस्त्यालगत महापालिका कर्मचारी वसाहतीच्या तीन इमारतींमध्ये एकूण 48 कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्यात या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरलं आहे. मात्र मुंबईतील नायर रुग्णालयात असलेला हा रुग्ण भिवंडीत कसा आला? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे.