नवी दिल्ली : जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जगभरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 30 लाख पार पोहोचली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची संख्या आतापर्यंत 30 लाख 64 हजार 225 एवढी आहे. तर दोन लाख 11 हजार 537 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसच्या जीवघेण्या आजाराच्या विळख्यातून आतापर्यंत 9 लाख 22 हजार 387 लोक कोरोनामक्त झाले आहेत.


अमेरिकेमध्ये कोरोनाचं मृत्यूतांडव सुरूच


कोरोनामुळे जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत एकट्या अमेरिकेत कोरोना व्हायरसचे 32 टक्के रूग्ण आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10 लाख 10 हजार 356 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच 56 हजार 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात एक लाख 38 हजार 990 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.


स्पेन दुसऱ्या आणि इटली तिसऱ्या क्रमांकावर


अमेरिकेनंतर सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या स्पेनमध्ये आहे. आतापर्यंत दोन लाख 29 हजार 422 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच 23 हजार 511 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेननंतर तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. इटलीमध्ये आतापर्यंत एक लाख 99 हजार 414 रूग्ण आहेत. येथे आतापर्यंत 26 हजार 977 लोकांचा मृत्यू झाला आहे.


भारतातही कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव

भारतात गेल्या 24 तासात 1396 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता 28 हजार पार गेला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 184 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.