वॉशिग्टन: ब्रिटन, बहारीन, कॅनडा नंतर आता अमेरिकेनेही Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी दिली आहे. अमेरिकेत कोरोनावर वापरण्यात येणारी ही पहिली लस असेल.


ही लस सर्व नागरिकांना मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीय. आता ही घोषणा अमलात आणने शक्य होणार आहे का असा प्रश्न विचारला जातोय.


या आधी ब्रिटन, बहारीन, कॅनडा या देशांनी Pfizer-BioNtech च्या कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिली आहे. ब्रिटनमध्ये तर लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची मंजुरी देणारा अमेरिका आता जगातील चौथा देश बनला आहे.


ट्रम्प प्रशासनाकडून धमकी
व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी शुक्रवारी फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या प्रमुखांना धमकी दिली असल्याचा प्रकार समोर आलाय. जर फायझरच्या लसीच्या वापराला मान्यता दिला नाही तर आपला राजीनामा द्यावा अशा प्रकारची धमकी देण्यात आल्याचं सागितलं जातं.


फायझर आणि बायोएनटेकची भागिदारी
फायझर या लस निर्मिती करणाऱ्या कंपनीनं आपल्या जर्मन भागीदारी कंपनी बायोएनटेक सोबत मिळून ही लस विकसित केली आहे. या वर्षाअखेरपर्यंत 5 कोटी डोस आणि 2021 सालाच्या अखेरपर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे.


ब्रिटनमध्ये लसीकरणास सुरुवात
या लसीच्या वापराला मान्यता देणारा ब्रिटन हा पहिलाच देश ठरला होता. मंगळवार पासून त्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. बहारीन आणि कॅनडातही लवकरच लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


भारतातही Pfizer-BioNtech या कंपनीने इमर्जंन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटची लसही अंतिम टप्प्यात आहे. भारतात एकूण आठ लसींवर क्लिनिकल ट्रायल सुरु असल्याचं समजतंय.


महत्वाच्या बातम्या: