वॉशिंग्टन : अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटना (WHO) सोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत घोषणा केली. "जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातातील बाहुलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत," असं ट्रम्प यांनी जाहीर केलं. दरम्यान कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत आहे.
कोरोना व्हायरसला सुरुवातीच्या स्तरापासून रोखण्यात जागतिक आरोग्य संघटनेला अपयश आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. सोबतच चीनवरही चहूबाजूंनी टीका केली. कोरोना व्हायरसच्या महामारीवरुन ट्रम्प यांनी यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.
कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी चीन-WHO जबाबदार
कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंसाठी जागतिक आरोग्य संघटना आणि चीन जबाबदार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. ट्रम्प म्हणाले की, "वार्षिक केवळ 40 मिलियन डॉलर (4 कोटी डॉलर) मदत देऊनही चीनचं जागतिक आरोग्य संघटनेवर नियंत्रण आहे. दुसरीकडे या तुलनेत अमेरिका WHO ला वार्षिक 45 कोटी डॉलर एवढी मदत करत होती. परंतु आवश्यक उपाययोजना करण्यात अपयश आल्याने आम्ही आजपासून जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध संपवत आहोत."
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणार निधीही थांबणार आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "जागतिक आरोग्य संघटनेचा रोखलेला निधी आता जगातील इतर आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाईल."
चीनच्या वुहान व्हायरसमुळे एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा मृत्यू
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा उल्लेख वुहान व्हायरस असा केला. "चीनने वुहान व्हायरसबाबत माहिती लपवून कोरोना संपूर्ण जगभरात पसरण्याची परवानगी दिली. यामुळे जागतिक महामारी आली आणि एक लाखांपेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांचा जीव घेतला. संपूर्ण जगभरात लाखो नागरिकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला," असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.
अमेरिकेत जवळपास 18 लाख कोरोनाबाधित, 1 लाख 4 हजार नागरिकांचा मृत्यू
अमेरिका कोरोना व्हायरसचं केंद्र बनलं आहे. इथे या महामारीने भयावह रुप घेतलं आहे. वर्ल्डोमीटरनुसार अमेरिकेत आज (30 मे) सकाळपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 17 लाख 93 हजारांच्या पार गेली आहे. तर एकूण एक लाख 4 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 5 लाख 19 हजार जण कोरोनामुक्त झाले आहे. शुक्रवारी (29 मे) अमेरिकेत 25,069 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर 1,212 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. जगभरातील सुमारे एक तृतियांश कोरोनाचे रुग्ण अमेरिकेतच आहेत. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलिफोर्नियामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.