Coronavirus : चीनसह जगातील अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. चीनमध्ये नुकताच दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये एका वर्षाहून अधिक काळानंतर कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढल्यानंतर जगातील सर्व देशांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. चीनमध्ये कोरोना महामारी पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे.


चीनमध्या सध्या फेब्रुवारी 2020 नंतरची सर्वात वाईट परिस्थिती आहे. काही दिवसांपासून दररोज चीनमध्ये तीन हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. याशिवाय आणखी एक चिंतेची बाब म्हणजे जागतिक दैनंदिन रुग्णांमध्ये 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्हणजेच कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे.


जागतिक स्तरावर कोरोना संसर्ग वाढता
जागतिक स्तरावर, कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची सरासरी संख्या 12 टक्क्यांनी वाढून 18 लाखांपर्यंत पोहोचली आहे. फ्रान्समध्ये या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर इटली आणि ब्रिटनमध्येही 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.


अमेरिकेतही कोरोनाचा धोका
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शुक्रवारी सांगितले की, गुरुवारी चीनमध्ये 4,292 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर, कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 16,974 झाली आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरात आढळला होता. चीनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 4,636 मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत अजूनही कोरोनाचे 20 दशलक्षाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. मात्र, गेल्या काही आठवड्यांत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्येही घट झाली असली तरी धोका अजूनही कायम आहे.


युरोप
युरोपीय देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. 18 मार्च रोजी एकट्या जर्मनीमध्ये सुमारे दोन लाख नवीन प्रकरणांची नोंद झाली आहेत. जर्मनीत एकूण 35 लाख सक्रिय रुग्ण समोर आले आहेत. इंग्लंड, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड आणि इटलीमध्ये नवीन प्रकरणे वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, जगभरात डेल्टाक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, डेल्टाक्रॅन जगात नवीन कोरोनाची लाट निर्माण करू शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha