ब्रासिलिया : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. "कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असून मला कोणताही त्रास होत नसून मी बरा आहे," असं बोल्सोनारो यांनी सांगितलं. ब्राझीलमधील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये ब्राझील सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ब्राझीलमध्ये जवळपास 16 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित आहेत. यापैकी जवळपास 66 हजार नागरिकांचा जीव गेला आहे. जेअर बोल्सोनारो यांच्या सरकारने कोरोनासंदर्भातील खबरदारीच्या उपाययोजना न केल्याचा आरोप होत आहे.
मास्क काढून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची घोषणा
दरम्यान बोल्सोनारो यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्यांच्यावर टीकाही होत आहे. ब्राझिलियाच्या अल्वोरदा पॅलेसमध्ये मीडियासमोर आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर करताना अध्यक्षांनी चक्क मास्क काढला. हे जाहीर केल्यानंतर त्यांनी पुन्हा मास्क लावला. सध्या खबरदारी म्हणून मास्क वापरणं बंधनकारक आहे. त्यात जर एखादा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्याने मास्क लावणं अनिवार्य आहे. मात्र एखाद्या देशाचे अध्यक्ष असलेले बोल्सोनारो बेजबाबदार वागल्याने त्यांच्यावरी टीका होत आहे.
कोरोनाचा संसर्ग होत असताना सुरुवातीच्या काळात, कोरोना व्हायरस सामान्य फ्लू असल्याचं बोल्सोनारो यांनी म्हटलं होतं. "मला कोरोनाची लागण झाली तरी मी या सामन्य फ्लूसमोर हार मानणार नाही. कोरोना व्हायरसप्रमाणे अनेक फ्लू आहेत, ज्यामुळे अधिक लोकांना मृत्यू होतो," असं त्यांनी म्हटलं होतं. कोरोना व्हायरससारख्या महामारीला हलक्यात घेणे ब्राझीलला चांगलंच महागात पडत आहे.
वर्ल्डोमीटर वेबसाईटच्या आकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये सध्या 16 लाख 43 हजार 539 कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आतापर्यंत ब्राझीलमध्ये 66 हजार 93 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 10 लाख 72 हजार 229 रुग्णांनी कोरोनावर मत केली आहे.
Hawkers | कोरोनाच्या काळात रस्त्यावरील फेरीवाले सर्वात धोकादायक,राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका