मुंबई : कोरोना व्हायरसच्या साथीने संपूर्ण जग त्रस्त असतानाच चीनमध्ये ब्युबॉनिक प्लेग या नव्या रोगाचे दोन संशयित सापडले आहेत. ब्यूबॉनिक प्लेग bubonic plague किंवा Black Death या नावाने ओळखला जाणारा हा आजार दुर्मिळ प्रकारातील जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. चीनने या आजाराविषयी आणि चीनमध्ये सापडलेल्या संशयित रुग्णांविषयी जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिल्याचं चीनच्या अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या शिनुआच्या बातमीत म्हटलं आहे. पश्चिम मंगोलियातील खोवाद प्रांतात या ब्युबॉनिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.


जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ब्युबॉनिक प्लेगवर वेळीच उपचार झाले नाहीत तर 24 तासात लागण झालेल्या बाधिताचा मृत्यू होतो. यामुळेच याला ब्लॅक डेथ असंही म्हटलं जातं.


उत्तर चीनमधील मंगोलियातील बायान्नूर या स्वायत्त प्रांताने आपल्या भागात ब्युबॉनिक प्लेगचे दोन रुग्ण आढळून आल्याचं स्पष्ट केलं. सरकारी मालकीच्या पीपल्स डेली ऑनलाईन या दैनिकाने रविवारी याबाबतचं वृत्त प्रकाशित केलं. ब्युबॉनिक प्लेगचे हे दोन संशयित 27 वर्षीय तरुण आणि त्याचा भाऊ आहे. तो 17 वर्षांचा आहे. या दोन्ही भावांनी चीनमधील खारीच्या जातीच्या प्राण्याचं मांस खाल्लं होतं. त्यामुळे हा आजार बळावल्याचं सांगितलं जातं. या माहितीनंतर चीनमध्ये खारीच्या जातीच्या या प्राण्याचं मांस न खाण्याविषयी निर्देश जारी करण्यात आले आहेत.


आतापर्यंतच्या ज्ञात संशोधनानुसार, ब्युबॉनिक प्लेग हा आजार उंदरांच्या अंगावर असलेल्या पिसांमुळे होतो. या आजाराचे जीवाणू उंदरांच्या अंगावर सापडतात. मात्र चीनमध्ये आढळून आलेला ब्युबॉनिक प्लेग हा खारीच्या मांसामुळे झाल्याचं सांगितलं जात असलं तरी उंदरांवर असतात तशा पिसवा खारीच्या अंगावरही असतात का याविषयी अजून निश्चित माहिती नाही, तरीही मंगोलियातील चिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खारीचं मांस न खाण्याचे निर्देश जारी केले आहेत.


चीनच्या बाय्यानूर या प्रांतातील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ब्युबॉनिक प्लेगच्या मोठ्या प्रसाराची भीती व्यक्त केली आहे, त्यांनी दिलेला इशारा 2020 वर्षाच्या अखेरपर्यंतचा आहे. लोकांनी या प्लेगपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वसंरक्षणाचे सर्व उपाय या वर्षअखेरपर्यंत अवलंबले पाहिजेत असं वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.


बाय्यानूरमधील या दोन तरुण भावांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 146 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.


पश्चिम मंगोलियातीलच बायान उलगी या प्रांतात गेल्यावर्षी खारीचं मांस खाल्यामुळे ब्युबॉनिक प्लेग होऊन एका जोडप्याचा मृत्यू झाला होता.


चिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोना व्हायरसप्रमाणेच डुकरांच्या मासांतून प्रसार होण्याची शक्यता असलेल्या फ्लूची साथ पसरण्याचा इशारा जारी केल्यानंतर लगेच ब्युबॉनिक प्लेगच्या संसर्गाविषयी माहिती आली आहे. डुकराचं मास खाल्ल्याने लागण होण्याची शक्यता असलेला फ्लू जागतिक महामारीप्रमाणे पसरु शकतो. एकदा माणसांच्या संपर्कात आल्यानंतर मानवी संसर्गातून पसरण्याची या फ्लूची क्षमता आहे.


ब्युबॉनिक प्लेग काय आहे? तो कशामुळे होतो, त्याच्या प्रसाराची भीती किती आहे?
ब्युबॉनिक प्लेग हा प्राण्यातून मानवामध्ये संक्रमित होणारा आजार आहे. खारीच्या अंगावरील पिसवा चावल्यामुळे या आजाराचं प्राण्यातून मानवात संक्रमण होतं. तिथून पुढे माणसातून माणसात याचं संक्रमण होतं. आधीच या प्लेगची लागण असलेल्या प्राण्याच्या संपर्कातूनही या आजाराची लागण होऊ शकते.


ब्युबॉनिक प्लेगची लक्षणे
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी या सामान्य लक्षणांबरोबरच गळ्यात किंवा मानेवर तसंच काखेत मोठी गाठ swollen lymph nodes येते. ही गाठ अनेकदा कोंबडीच्या अंड्याच्या आकाराएवढी असू शकते.


2010 ते 2015 या पाच वर्षात ब्युबॉनिक प्लेगची लागण झालेले तब्बल 3200 बाधित होते. त्यापैकी 584 जणांचा मृत्यू झाला.


चौदाव्या शतकात ब्युबॉनिक प्लेगमुळे आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडात तब्बल 50 दशलक्ष म्हणजे पाच कोटी लोकांचा बळी गेला होता. तेव्हापासूनच ब्युबॉनिक प्लेगला ब्लॅक डेथ असं म्हटलं जात आहे.