Coronavirus Botswana Variant :  कोरोना महासाथीचा जोर ओसरत असताना जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, दुसरीकडे पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजू लागली आहे. कोरोनाचा विषाणू स्वरूप बदलून समोर येत असल्याने चिंता वाढत आहे. कोरोनाने पुन्हा एकदा स्वरूप बदलले असून वैज्ञानिक हा वेरिएंट घातक असल्याचे म्हणत आहेत. आफ्रिकेत आढळलेला 'बोत्सवाना  व्हेरिएंट' बाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या  व्हेरिएंटनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. 


कोणत्या  व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ?


कोरोनाच्या नव्या वेरिएंटचे नाव B.1.1.529 आहे. याला 'बोत्सवाना  व्हेरिएंट'ही म्हटले जाते. आफ्रिकन खंडातील देश बोत्सवानामध्ये हा वेरिएंट आढळला.  दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीजने या वेरिएंटला दुजोरा दिला आहे. बी.1.1.529 वेरिएंटचा संसर्ग एका रुग्णाद्वारे फैलावला असल्याचे म्हटले जात आहे. लंडन येथील युसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रॅक्वा बेलॉस यांनी म्हटले की, हा  व्हेरिएंट एखाद्या गंभीर आजाराशी दोन हात करणाऱ्या रुग्णापासून तयार झाला आहे. या रुग्णाला एचआयव्ही/एड्स असण्याची शक्यता आहे. 


नवीन वेरिएंटला 'बोत्सवाना  व्हेरिएंट' का म्हणतात?


कोणत्याही देशाच्या नावावर  व्हेरिएंटचे नाव ठेवण्यास जागतिक आरोग्य संघटनेची अधिकृत मान्यता नाही. कोणत्या  व्हेरिएंटला एखाद्या देशाचे नाव देण्यात येऊ नये अशी सूचना WHO ने दिली आहे. मात्र, एखादा नवीन  व्हेरिएंट आढळल्यानंतर सहज बोलता चालता त्या संबंधित देशाचे नाव दिले जाते. या आठवड्यात  दक्षिण आफ्रिकेत  मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर  या नव्या व्हेरिएंटची माहिती समोर आली. मात्र, बोत्सवानामध्ये B.1.1.529 चे सर्वाधिक 32 म्युटेशन आढळले आहे. त्यामुळे 'बोत्सवाना  व्हेरिएंट' म्हटले जाऊ लागले आहे. 


सध्या 'बोत्सवाना व्हेरिएंट'चे किती रुग्ण आहेत?


आतापर्यंत जगभरात या प्रकाराचे 100 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बहुतेक दक्षिण आफ्रिकेत 100 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय बोत्सवानामध्ये १०, हाँगकाँगमध्ये दोन आणि इस्रायलमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. मात्र, तो वेगाने पसरण्याची भीती असल्याने खळबळ उडाली आहे.


हा व्हेरिएंट किती धोकादायक?


जगभरातील तज्ज्ञ या प्रकाराला मोठा धोका मानत आहेत. तज्ज्ञांच्या मते, B.1.1529 व्हेरिएंटपेक्षा जास्त वेगाने संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, इंम्पिरिअल कॉलेज लंडनचे विषाणू तज्ज्ञ डॉ. टॉम पीकॉक यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर व्हायरसच्या नवीन प्रकाराविषयी माहिती दिली. ते म्हणाले की जगातील प्रमुख डेल्टा स्ट्रेनसह इतर कोणत्याही प्रकारापेक्षा हा व्हेरिएंट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे.


हा व्हेरिएंट इतका धोकादायक का?


B. 1.1.529 या प्रकारात 50 हून अधिक उत्परिवर्तन (म्युटेशन) सापडले आहेत, त्यापैकी 32 उत्परिवर्तन त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी विषाणू स्पाइक प्रोटीनची मदत घेतो. याव्यतिरिक्त, व्हेरिएंटच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये 10 उत्परिवर्तन झाले. डेल्टा व्हेरियंटमध्ये असे फक्त दोन उत्परिवर्तन होते. जेव्हा डेल्टा व्हेरियंटने स्पाइक प्रोटीनमध्ये K417N उत्परिवर्तन केले तेव्हा डेल्टा प्लस प्रकाराचा जन्म झाला. या वेरिएंटने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची मोठ्या प्रमाणावर हानी केली होती. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली. 


कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना किती धोका?


जगभरात विकसित झालेल्या बहुतेक कोविड लसींचा हल्ला फक्त स्पाइक प्रोटीनवर होतो. बोत्सवाना प्रकारात स्पाइक प्रोटीनमध्ये 32 उत्परिवर्तन असल्याने, लशीला प्रभावहीन करण्यास हा व्हेरिएंट सक्षम आहे. हाँगकाँगच्या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचा डोस घेतला होता, तरीही त्यांना संसर्ग झाला. हा नवा व्हेरिएंट लशीचा प्रभाव संपुष्टात आणण्यास सक्षम असल्याचे तज्ज्ञ म्हणतात. 


कोरोना विषाणूचा नवीन प्रकार हवेतून पसरतो का?


हाँगकाँगमध्ये सापडलेल्या नवीन प्रकारातील दोन्ही रुग्णांना फायझरची कोरोना लस घेतली होती. हे रुग्ण आफ्रिकेतून परतले  होते. त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्या नमुन्यांच्या तपासणीत विषाणूचे प्रमाण खूप जास्त आढळून आले. त्यामुळेच नवीन प्रकार हवेतून पसरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आज आपल्या धोक्याचा विचार करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे.


नवीन व्हेरिएंटबाबत जगात काय चर्चा सुरू?


B.1.1.529 प्रकाराबाबत संपूर्ण जग सावध झाले आहे. आफ्रिकन देशांची उड्डाणे थांबवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इस्रायलने सात आफ्रिकन देशांच्या प्रवासावर निर्बंध लादले आहेत. इस्रायल सरकारने दक्षिण आफ्रिका, लेसेथो, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझांबिक, नामिबिया आणि इस्वाटिनी या देशांचा 'रेड लिस्ट'मध्ये समावेश केला आहे. त्याच वेळी, ब्रिटनने सहा आफ्रिकन देशांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. सरकारने या देशांची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. त्याचबरोबर सिंगापूरनेही आफ्रिकन देशांमध्ये जाणारी विमान सेवा स्थगित केली आहेत.


ताज्या परिस्थितीचा शेअर बाजारांवरही परिणाम झाला आहे का?


नवीन व्हेरिएंट आढळल्याच्या वृत्तानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये घसरणीचा कल दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीही घसरल्या आहेत. अमेरिका, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, कोरिया, न्यूझीलंडसह सर्व शेअर बाजारात चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. भारतातही सेन्सेक्स सकाळी 13.30 च्या सुमारास 1300 हून अधिक अंकांनी तुटला होता. तर, निफ्टीतही 372 अंकांची घसरण झाली.