WHO On Corona Cases : जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. भारतात देखील कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. असं असलं तरी नागरिकांकडून म्हणावी तशी काळजी सध्या घेतली जात नसल्याचे चित्र आहे. भारतात काही राज्यांमध्ये पुन्हा मास्कसक्ती करण्यात आली आहे. अशात जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)नं एक नवा सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोरोनाचे पुढील व्हेरियंट चिंतेचे कारण असू शकतात, असा इशारा WHOकडून देण्यात आला आहे. 


डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड हेड मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी म्हटलं आहे की, कोरोनाचा पुढील प्रकार काय असेल याबाबत अनिश्चितता आहे. मात्र हे आमच्यासाठी चिंतेचे कारण आहे. कोरोनाच्या पुढील व्हेरियंटसाठी आपल्याला विविध प्रकारच्या योजना आखणे आवश्यक आहे. तसेच ओमायक्रॉन सध्या जगभरात प्रभावी आहे. BA.4, BA.5, BA.2.12.1 या प्रकारातील व्हेरियंट चिंतेचे कारण बनू शकतात, असं मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी सांगितले.




केरखोव्ह यांनी सांगितलं की, जगाला सध्या मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी आता कोविड 19 वर आपल्याकडे बऱ्यापैकी उपाय उपलब्ध आहेत. ओमायक्रॉनमुळं अनेकांना मृत्यू आलाय तर अनेकांना गंभीर आजार तसेच पोस्ट कोविडमुळं त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामुळं कोरोनाच्या पुढील व्हेरियंटचा सामना करण्यासाठी आपल्याला उपलब्ध साधनांचा तर्कशुद्ध पद्धतीनं वापर करावा लागणार आहे. केरखोव्ह म्हणाल्या की, आपल्याकडे अशी संसाधने आहेत जी जीव वाचवू शकतात परंतु आपल्याला त्यांचा वापर धोरणात्मकपणे करणे आवश्यक आहे.


डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी सांगितलं होतं की, कोविड -19 च्या टेस्टिंग कमी झाल्या आहेत. त्यामुळं कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचं दिसत आहे. जागतिक स्तरावर कोरोना मृत्यूचं प्रमाण देखील कमी झालं आहे. मात्र कोरोना महामारी अद्याप संपलेली नाही असं  डब्ल्यूएचओचे प्रमुखांनी सांगितलंय.  गेल्या आठवड्यात कोविड मृत्यू संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओकडे आठवड्यात 15 हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. जी मार्च 2020 नंतरची सर्वात कमी मृत्यू संख्या आहे. मृत्यू कमी होणं काहीसं समाधानकारक असलं तरी कोरोना संपूर्णपणे संपलेला नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.