Covid Can Attack on Kidney Eye : दोन वर्षानंतरही कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग कमी झालेला नाही. नव्या वर्षातही कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोना विषाणू स्वत:च्या मूळ प्रकारात बदलून अधिक लोकांना संक्रमित करत आहे. सध्या जगभरात कोरोनाच्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. कोरोना विषाणूवर जगभरातील शास्त्रज्ञांकडून संशोधन सुरु आहे. दररोज नवीनवीन माहिती समोर येत आहे. आता एका नव्या संशोधनानुसार, कोरोना विषाणू मानवाच्या छातीतच नाही तर, डोळे आणि किडनीमध्येही शिरकाव करतो, अशी माहिती समोर आली आहे.
शरीरात 84 वेगवेगळ्या ठिकाणी आढळला कोरोना विषाणू
अमेरिकेतील मॅरीलँड युनिव्हर्सिटीने कोरोना विषाणू संदर्भात नवीन संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. मॅरीलँड विद्यापीठाने कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर संशोधन केले. या संशोधनामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 44 रुग्णांच्या मृतदेहावर संशोधन करण्यात आले असून त्यामध्ये मोठी माहिती उघड झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो, याची माहिती जाणून घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांना आढळून आले की, कोरोना विषाणू शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिरकाव करतो. शास्त्रज्ञांना मृतदेहामध्ये 84 वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना विषाणू आढळून आला. श्वसनमार्गावर आणि फुफ्फुसाच्या ऊतींवर त्याचा सर्वात गंभीर परिणाम दिसून आला.
लसीकरण न केलेल्या रुग्णांवर काय परिणाम?
या संशोधनासाठी कोविड लसीकरण न झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर संशोधन करण्यात आले. या रुग्णांचे कोरोना लसीकरण झालेले नव्हते आणि त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या मृतदेहांमध्ये मेंदू, आतडे, हृदय, मूत्रपिंड, डोळा, लिम्फ नोड्स आणि एड्रॅनल ग्लँडमध्येही कोरोना विषाणू आढळून आला. कोरोना संसर्गाच्या वेगवेगळ्या स्टेजमधील रुग्णांच्या टिश्यूचा वापर या संशोधनामध्ये करण्यात आला. यामध्ये कोरोनाची लागण झाल्यावर सुरुवातीची लक्षणे म्हणजे सुरुवातीच्या 14 दिवसांपासून ते कोरोना विषाणू संसर्ग गंभीर झाल्यानंतर नऊ महिन्यांपर्यंतच्या रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. सर्व रुग्ण वृद्ध होते.
कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर वेगवेगळा परिणाम
कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम दिसून आला आहे. अलीकडेच, अमेरिकेमधील स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसिनच्या टीमने अनेक कोविड रुग्णांच्या पोस्टमॉर्टम टिश्यू नमुन्यांचे सखोल विश्लेषण केले. त्यांना व्हायरल आरएनएचा कोणताही मागमूस सापडला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या