Coronavirus Disease : जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. कोरोना महामारीचा पुन्हा एकदा झपाट्याने प्रादुर्भाव वाढण्याचे संकेत जागतिक आरोग्य संघटनेनं दिले आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 11 टक्केंनी वाढ झाली आहे. अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. फ्रान्समध्ये मागील 24 तासांत तब्बल दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर अमेरिकामध्ये मागील 24 तासांत साडेचार लाख रुग्णांची नोंद झाली आहे. 


 अमेरिका आणि फ्रान्समध्ये कोरोना महामारीने हाहा:कार माजवलाय. फ्रान्समध्ये मागील 24 तासांत दोन लाख 8 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर अमेरिकेत मागील 24 तासांत 4 लाख 41 हजार 278 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. तसेच कोरोना नियमांचं पालन करण्याचा सल्लाही दिला आहे. 


कोरोनाचा विस्फोट-  
जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी जारी केलेल्या साप्ताहिक महामारी रिपोर्ट्समध्ये अंगावर शहारे आणणारे आकडे समोर आले आहेत. WHOने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर यादरम्यान जगभरात 50 लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील सर्वाधिक रुग्ण युरोपमधील असून त्याची संख्या 28.4 लाख इतकी आहे. दरम्यान, गेल्या आठवड्याच्या तुलनेत युरोपमधील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढ तीन टक्केंनी आहे.  अमेरिका खंडात साप्ताहिक कोरोना रुग्णांची संख्या 39 टक्केंनी वाढली आहे. अमेरिका खंडात गेल्या आठवड्यात 14.8 लाख रुग्ण आढळले आहेत. अमेरिकेतील रुग्णसंख्याही 34 टक्केंनी वाढली आहे. आठवडाभरात अमेरिकेत 11.8 लाख रुग्ण आढळले आहेत.  आफ्रिकामध्ये नवीन रुग्णांच्या संख्येत सात टक्केंनी वाढ पाहायला मिळाली आहे. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live