नवी दिल्ली : ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याप्रकरणी बडा मासा भारताच्या हाती लागला आहे. सीबीआयने याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक ख्रिश्चियन मिशेलला दुबईतून भारतात आणण्यात आलं आहे. भारतात लँड होताच सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतलं आहे.
दुबई कोर्टाच्या प्रत्यार्पणानंतर काल संध्याकाळी यूएइनं ख्रिश्चियन मिशेलला भारताच्या ताब्यात दिलं. सीबीआयने रात्रीच मिशेल दिल्लीला आणलं. त्यानंतर त्याला थेट सीबीआय कार्यालयात नेण्यात आले. या घोटाळ्यासंबंधी सीबीआय मिशेलची चौकशी करणार आहे. आज त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करणार आहे.
हेलिकॉप्टर घोटाळ्यात ऑगस्टा वेस्टलँडकडून 225 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप ख्रिश्चियनवर लावण्यात आला आहे. याप्रकरणातील आणखी दोन मध्यस्थ अद्याप फरार आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल डोवाल यांची प्रमुख भूमिका
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल डोवाल यांच्यावर ख्रिश्चियन मिशेलच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वात प्रत्यार्पणाची संपूर्ण कामगिरी पार पडण्यात आली असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे.
काय आहे ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा?
भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदी करण्याचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.
या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.
या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते.
इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात 125 कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इटलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आलं आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे.
महत्त्वाचं म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे.
संबंधित बातम्या
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : तीन मोठी नावं सीबीआयच्या रडारवर
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : माजी वायूदल प्रमुख एसपी त्यागी अटकेत
ऑगस्टा घोटाळा : राहुल गांधींचीही चौकशी करा : सोमय्या
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : मुख्य आरोपी ख्रिश्चियन मिशेल भारताच्या ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Dec 2018 08:08 AM (IST)
हेलिकॉप्टर घोटाळ्यात ऑगस्टा वेस्टलँडकडून 225 कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप ख्रिश्चियनवर लावण्यात आला आहे. याप्रकरणातील आणखी दोन मध्यस्थ अद्याप फरार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -