मुंबई : चीनची प्रयोगशाळा मुंबई किंवा महाराष्ट्रातील एखाद्या भागात कोसळण्याचा धोका टळला. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चिनी स्पेस स्टेशनचे तुकडे झाले आणि पॅसिफिक महासागरात कोसळले. टीयाँगाँग हे चिनी स्पेस स्टेशन साधारण स्कूल बसच्या आकाराचं होतं.


इस्टर्न डे टाईमनुसार रविवार एक एप्रिलच्या रात्री 8 वाजून 16 मिनिटांनी म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 5 वाजून 16 मिनिटांनी दक्षिण प्रशांत महासागरात कोसळलं. टीयाँगाँग 34 फूट लांब आणि 11 फूट रुंद होतं, तर त्याचं वजन 9 टनापेक्षा जास्त होतं.

या स्पेस स्टेशनच्या संभाव्य मार्गात मुंबईसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर अशा पट्ट्याचा समावेश होता. सोमवारी पहाटे चार वाजून 55 मिनिटांनी ही प्रयोगशाळा कोसळण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. स्पेस स्टेशनचा वेग पाहता, ते नेमकं कुठे पडेल, याचा अंदाज बांधणं कठीण होतं. या प्रयोगशाळेचे तुकडे 200 ते 300 किलोमीटर परिसरात पसरण्याची भीती होती.

29 सप्टेंबर 2011 रोजी टीयाँगाँग हे स्पेस स्टेशन लॉंच करण्यात आलं होतं. दोन वर्षांसाठी या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली होती, मात्र  2016 मध्ये स्पेस स्टेशनशी चीनचा संपर्क तुटला. तेव्हापासून ही प्रयोगशाळा अंतराळात कुठल्याही नियंत्रणाशिवाय फिरत होती.

हे स्पेस स्टेशन समुद्रात पाडण्याचीच योजना होती, मात्र त्याआधीच त्याच्यासोबत संपर्क तुटल्यामुळे इतरत्र पडण्याची भीती वर्तवली जात होती. बहुतेक वेळा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यावर अशा वस्तू जळून खाक होतात, त्याचप्रमाणे ही प्रयोगशाळा जळून तुकडे होऊन प्रशांत महासागरात पडली.