China Vs India : आधी भारत-चीन सीमारेषेजवळ (LAC) चक्क 600 गावे वसवली, आता तिथे नागरिक राहत आहेत, चीन LAC वर नेमका कोणता धोकादायक कट रचत आहे? असा प्रश्न अवघ्या जगाला पडला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या एका रिपोर्टमध्ये चीनने LC च्या जवळपास 600 गावांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. यापैकी निम्मी म्हणजे सुमारे 300 गावे आधीच तयार झाली आहेत. आता चीनने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सीमेजवळ गावे वेगाने वसवण्याचे काम सुरू केले आहे, त्यामुळे नेमका कोणता कट चीनकडून रचला जातोय? याचा अंदाज लावला जातोय.
चीनचा हा प्रयत्न काही नवीन नाही
1962 च्या युद्धानंतर प्रथमच 2020 मध्ये लडाखमधील पँगॉन्ग तलावाजवळ भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुमारे 20 भारतीय जवान शहीद झाले, तर सुमारे 50 चिनी सैनिकही मारले गेले.17,000 फूट उंचीवर चिनी सैन्यासोबत ही चकमक झाली, पण चीनचा हा प्रयत्न काही नवीन नाही. आता दोन वर्षांनंतर चिनी लष्कराने तवांगमध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असून, त्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनला तवांगच्या यांगशी भागावर कब्जा करायचा आहे. कारण कधी या भागात ड्रोन उडताना दिसतो तर कधी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो.
चीनचा निवासी उद्देशांपेक्षा लष्करी हेतू?
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आलेल्या अहवालात चीनने एलएसीच्या जवळपास 600 गावांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. यापैकी निम्मी म्हणजे सुमारे 300 गावे आधीच तयार झाली आहेत. विशेषत: अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सीमेजवळ चीनने ही गावे वेगाने वसवण्याचे काम सुरू केले आहे. गावांच्या नावाने बांधलेल्या इमारतींमध्ये टेहळणीसाठी टॉवरही बांधण्यात आले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की या इमारती निवासी उद्देशांपेक्षा लष्करी हेतूंसाठी अधिक डिझाइन केलेल्या आहेत. या गावांच्या माध्यमातून चीन गरज पडल्यास सीमेवर तात्काळ सैन्य पाठवण्यावर भर देत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
चीन दोन उद्देशांसाठी गावे वसवत आहे
भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे पूर्व लष्कराचे कमांडरही राहिले आहेत. ते म्हणाले होते की, चीन येथे दोन उद्देशांसाठी गावे वसवत आहे. पहिली म्हणजे इथे लोकसंख्या स्थायिक होऊ शकते. याशिवाय चीन सैनिकांचीही व्यवस्था करत आहे. ही गावे चिनी लष्कराच्या तळांच्या पुढे वसवली जात आहेत. अशा स्थितीत अतिक्रमणाचा धोका निर्माण होणार आहे. चीनची ही रणनीती आता फलदायी ठरत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे भारताची चिंताही वाढली आहे.