Zhengzhou Highway Accident : चीनमधील (China) एक भीषण आणि विचित्र अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये शेकडो गाड्या एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला आहे. चीनमध्ये झेंग्झॉ महामार्गावर (Zhengzhou Highway) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून हा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोशल मीडियावर या अपघाताचो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे. या फोटो आणि व्हिडीओवरून हा अपघात किती भीषण आणि विचित्र प्रकारे घडला आहे, हे स्पष्ट दिसत आहे. दुर्घटनास्थळी एकमेकांवर आदळलेल्या वाहनांचा खच दिसत आहेत. 


200 हून अधिक गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात


सीएनएन वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पुलावर ट्रक, बस आणि कार एकमेकांना धडकल्याचं एरियल व्ह्यू शॉटमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. शेकडो वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दाट धुक्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. द ग्लोबल टाईम्सच्या (Global Times) या चीनी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सकाळच्या वेळी दाट धुक्यामुळे हा अपघात झाला, त्यामुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळून ही दुर्घटना घडली. 






प्रवासी वाहनांमध्ये अडकले


चीनी मीडियानुसार, महामार्गावर पसरलेल्या धुक्यामुळे हा अपघात झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अनेक ट्रक आणि अनेक छोट्या गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. द ग्लोबल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेनंतर वाहनांचे चालक आणि प्रवासी त्यांच्या वाहनांमध्ये अडकले होते. प्रशासनाच्या वतीने वाहतूक पोलीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यासह आपत्कालीन सेवेतील कर्मचारी यांनी घटनास्थळी बचावकार्य राबवले आणि नागरिकांना अडकलेल्या वाहनांमधून सुखरुप बाहेर काढले. यासोबतच अग्निशमन दलाचा ताफाही घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. दरम्यान, या अपघातामध्ये एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


धुक्यामुळे घडला अपघात


अपघातावेळी उपस्थितांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, या अपघातामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने स्पष्ट दिसत नव्हते आणि रस्ता निसरडा झाला होता. त्यामुळे हा विचित्र अपघात घडला.