Covid Deaths In China : चीनमध्ये कोरोनामुळे (Coronavirus) मृत्यूचं तांडव सुरु आहे. याबाबत एका अमेरिकन संशोधन संस्थेचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ब्रिटनमधील (UK) संशोधन संस्था एअरफिनिटी रिसर्च फर्मच्या (Airfinity Firm) हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेना हा दावा केला आहे. एअरफिनिटी संस्थेच्या अहवालानुसार, चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 हून अधिक लोक कोरोनामुळे आपला जीव गमावत आहेत. तसेच या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्येच कोविड संसर्ग वेगाने पसरू लागला होता. या रिपोर्टनुसार, चीनमध्ये दररोज नऊ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.


दररोज 9000 हून अधिक जणांचा मृत्यू


जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरातील सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात असलेल्या चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती फार गंभीर आहे. एअरफिनिटी फर्मच्या मते, चीनमधील सुमारे 9,000 लोक दररोज कोविड-19 मध्ये आपला जीव गमावत आहेत.


चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यात कोरोना संसर्गाला सुरुवात


रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पुन्हा कोरोना विषाणू पसरण्यास सुरुवात झाली. पण नोव्हेंबर महिन्यात बीजिंगने आपले झिरो कोविड धोरण शिथिल करत कोरोना निर्बंध हटवले. यानंतर तेथे कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली.






जानेवारीत चीनमध्ये कोरोना रुग्ण आणि मृत्यू वाढणार


जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक पाहायला मिळणार आहे.  जानेवारी महिन्यात चीनमधील कोरोना संसर्ग शिगेला पोहोचेल. एअरफिनिटी फर्मने एका निवेदनात म्हटले आहे की, 1 डिसेंबरपासून चीनमध्ये 18.6 दशलक्ष लोकांना कोरोना संसर्ग होऊन एकूण मृत्यूची संख्या एक लाखापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एअरफिनिटीने सांगितले आहे की, चीनमधील विविध राज्यांमधील कोरोना परिस्थिती, त्यामधील बदल आणि संभाव्य रुग्णांच्या आधारे त्यांनी हा डेटा काढला आहे.


एप्रिल अखेरीस 1.7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता


अहवालानुसार, चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा उद्रेक जानेवारी महिन्यात पाहायला मिळेल. रिपोर्टनुसार, 13 जानेवारी रोजी 3.7 दशलक्ष रुग्ण संसर्गासह कोरोनाची उच्चतम पातळीवर गाठेल. चीनमधील बुधवारी 28 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोनामृतांची संख्या 5,246 होती. एअरफिनिटी रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, 2023 मध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस संपूर्ण चीनमध्ये 1.7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होऊ शकतो.