बिजिंग :  मोदी-ट्रम्प भेटीवरुन भारताला जाहीर धमकी देणाऱ्या चिनी माध्यमांनी पुन्हा भारतवर आगपाखड केली आहे. चीनमध्ये भारताची घुसखोरी ही फक्त अमेरिकेला खुश करण्यासाठी असल्याचं चीनमधल्या ग्लोबल टाईम्स या सरकारी मुखपत्रनं म्हटलं आहे. तसेच आपल्या भूभागाचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी भारतासोबत युद्ध करण्यास चीन लष्कर तयार असल्याचा इशाराही या लेखातून देण्यात आलाय.


ग्लोबल टाईम्समध्ये आलेल्या लेखात चीनने भारताची सीमारेषेवर सैन्य आणण्याची भूमिका ही फक्त डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी आहे, आम्ही चीनला कशी टक्कर देऊ शकतो हे दाखवण्यासाठी आहे असाही आरोप केला आहे. आपल्या भूभागाच्या रक्षणासाठी वेळ पडली तर भारताशी युद्धही करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, सिक्किममधील वादावरुनही या लेखात भारतावर आगपाखड करण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलाने भारत-चीन सीमेवरील वादग्रस्त सिक्कीमच्या भागात घुसखोरी केली आहे. चीनकडून रस्तेबांधणीच्या कामात खोडा घालण्यासाठीच भारतीय लष्कराने चीनच्या हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोपही या लेखातून करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच वृत्तपत्राने मोदी-ट्रम्प भेटीवरुन भारताला जाहीर धमकी दिली होती. भारताने अमेरिकेशी कितीही जवळीक साधली तरी भारताचा काहीही फायदा होणार नाही. पण ही जवळीक वाढल्यास, भारताला ते महाग पडेल असा इशारा ग्लोबल टाईम्समधील लेखात दिला होता. तसेच 1960 साली अमेरिकेने कशाप्रकारे भारताचा वापर केला हे भारताने विसरु नये, असा सल्लाही चीनने भारताला दिला होता.

दुसरीकडे चीनच्या धमकीला संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरुण जेटलींनी 1962 मधील तो भारत आता राहिला नाही. 2017 मधील भारत आणि 1962 मधील भारत यामध्ये मोठा फरक आहे, असं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या

आजचा भारत 1962 सालातला नाही, अरुण जेटलींचं चीनला प्रत्युत्तर

…तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

चीनची दादागिरी, कैलास मानसरोवर यात्रा रोखली