इस्लामाबाद: अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सैय्यद सलाहुद्दीनची पहिली मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत सलाहुद्दीनने भारतावर हल्ले केल्याची कबुली दिली आहे.


इतकंच नाही तर आजही आपण भारतात कधीही हल्ले करु शकतो, असाही इशारा त्याने दिला.

पाकिस्तानी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा सगळा कबुलीनामा दिला आहे.

अमेरिकेने बंदी घातल्यामुळे माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही. मी आजही आंतरराष्ट्रीय बाजारातून शस्त्रं खरेदी करु शकतो, असंही सलाहुद्दीन म्हणाला.

तसंच हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानातून फंडिंग होत असल्याचंही त्याने कबूल केलं.

अमेरिकेकडून बंदी

सलाहुद्दीनवर अमेरिकेने नुकतीच बंदी घातली आहे. या बंदीमुळे सलाहुद्दीन चांगलाच चवताळला आहे. काश्मीरच्या आझादीसाठी माझा संघर्ष चालूच राहील, अशी गरळ सलाहुद्दीनने ओकली.

आम्ही दहशतवादी नाही. भारताकडून काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी आमचा संघर्ष आहे, असं तो म्हणाला.

सलाहुद्दीन हा कधी पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर कधी पाकिस्तानात राहतो. तिथूनच तो जम्मू-काश्मीरमध्ये दंगली भडकवतो, तसंच तो सातत्याने भारताविरोधी भूमिका घेत असतो.

सलाहुद्दीनची बायको आणि मुलं भारतातच राहतात. त्यांना चांगली नोकरीही आहे.