China Taiwan Tension :  अमेरिकेच्या हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे संतप्त झालेल्या चीनने तैवानला चिथावणी दिली आहे. चीनने तैवानच्या ईशान्य आणि नैऋत्य भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही क्षेपणास्त्रे चीनकडून तैवानच्या सागरी हद्दीत डागण्यात आली आहेत. चीनने सुमारे 2 तासात 11 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. 


इतर देशांजवळ पाण्यात जाणूनबुजून क्षेपणास्त्रांची चाचणी केल्याबद्दल तैवानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने  चीन सरकारचा तीव्र निषेध केला. तैवानने म्हटले आहे की, चीनच्या या कृतीमुळे तैवानची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असून प्रादेशिक तणाव वाढला आहे आणि नियमित आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि व्यापारावर परिणाम झाला आहे. 


चीनच्या चिथावणीमुळे आमच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. प्रदेशात तणाव वाढत आहे आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि व्यापारात अडथळा निर्माण होत आहे. आम्ही या बेजबाबदार वर्तनाचा निषेध करतो आणि आंतरराष्ट्रीय समुदायानेही तसे करावे असे आवाहन करतो, असे तैवानने म्हटले आहे.  


याबाबत चीनने सांगितले की, लष्करी सरावाचा भाग म्हणून त्यांनी गुरुवारी तैवान सामुद्रधुनीमध्ये अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. चीनच्या ईस्टर्न थिएटर कमांडने गुरुवारी सांगितले की, त्यांनी नियोजित सरावाचा एक भाग म्हणून तैवानच्या पूर्व किनारपट्टीवरील पाण्यावर पारंपारिक क्षेपणास्त्रांचे अनेक गोळीबार केले आहेत. गोळीबाराचा सराव पूर्ण झाल्यानंतर संबंधित सागरी आणि हवाई क्षेत्रावरील नियंत्रण काढून घेण्यात आले आहे. 


नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे तणाव  


तैवानच्या आजूबाजूच्या सहा भागात आपले नौदल, हवाई दल आणि इतर विभागांचे लष्करी सराव सुरू असल्याचे चीनने यापूर्वी जाहीर केले होते. तैवानचा हा आपला भूभाग असल्याचा चीन नेहमीच दावा करतो. अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी सध्या तैवानमध्ये आहेत. चीनने नॅन्सी पेलोसी यांना तैवानला न जाण्याचा इशारा दिला होता. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्यानंतर चीनने अमेरिकेला सांगितले की, हा चीनला भडकवण्याचा प्रयत्न असून त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. 


महत्वाच्या बातम्या


China Taiwan : तैवानची 6 बाजूंनी नाकेबंदी, चीन लष्कराकडून जल आणि हवाई क्षेत्रात गोळीबार सुरू 


Nancy Pelosi Taiwan Visit: 'कितीही विरोध होऊ द्या, आम्ही थांबणार नाही', नॅन्सी पेलोसींचा चीनला नाव न घेता इशारा