बीजिंग : पूर्व चीनमधील एका केजी शाळेबाहेर झालेल्या शक्तिशाली स्फोटात सात जणांना जीव गमवावा लागला. तर 66 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. शाळा सुटताना झालेल्या या स्फोटामुळे मृतांची संख्या वाढली आहे.
पूर्व चीनमधील जिआंसू प्रांतातील फेंग्शिआन शहरातल्या केजी शाळेच्या गेटबाहेर स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी स्फोट झाला. स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांनी
उपचारादरम्यान प्राण सोडले. जखमींपैकी 9 जणांची प्रकृती गंभीर आहे.
शाळा सुटण्याच्या वेळी स्फोट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आलेल्या पालकांची संख्याही मोठी होती. स्फोटात किती विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 'चायना यूथ डेली' वृत्तपत्रानुसार शाळेजवळच्या फूड स्टॉलवरील गॅस सिलेंडरमुळे स्फोट झाला, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत केजीतील विद्यार्थ्यांसोबत अनेक अपघात किंवा घातपात झाले आहेत. त्यामुळे स्फोटामागील कारण शोधण्याचं आव्हान स्थानिक पोलिसांपुढे आहे.