इस्लामाबाद : आखाती देशांत कतारला एकाकी पाडण्यासाठी सौदी अरेबियाने चांगलाच जोर लावला आहे. त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि सौदी राजे सलमान यांच्या भेटीत सौदी राजांनी तुम्ही कोणासोबत आहात? असा स्पष्ट सवाल पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केला आहे.


एक्सप्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, कतार संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी सोमवारी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद यांची भेट घेतली. यावेळी सौदी राजे सलमान यांनी पाकिस्तानला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.

पण सौदी राजांच्या या प्रश्नावर पाकिस्तानने तटस्थेची भूमिका घेतली असून, पश्चिम अशियातील राजकीय संकटात पाकिस्तान कोणाही एकाचा पक्ष घेऊ शकत नसल्याचं शरीफ यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

आखाती देशातील इजिप्त, सौदी अरेबिया, बहरीन, यूएई आदी देशांनी कतारशी आपले सर्व राजकीय संबंध तोडले आहेत. कतार दहशतवादी संघटनांना खतपाणी घातल असल्याचा या देशांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडूनही सावध भूमिका घेतली जात आहे.

दरम्यान, या भेटीची माहिती देणाऱ्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मुस्लीम जगतात मतभेद निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रश्नावर पाकिस्तानची तटस्थेची भूमिका आहे. पण तरीही सौदी अरबला शांत करण्यासाठी पाकिस्तान कतारवरील आपल्या प्रभावाचा वापर करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यासाठी सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ कुवेत, कतार आणि तुर्कस्थानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शरीफ यांच्यासोबत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा आणि इतर काही वरीष्ठ अधिकारीही जाणार आहेत. या दौऱ्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान सोमवारी जेद्दामध्ये होते.

दरम्यान, शरीफ यांनी सौदी राजे सलमान यांची भेट घेऊन मुस्लीम समाजाच्या हिताचा विचार करुन आखातातील राजकीय संकटावर लवकर मार्ग काढण्याचं आवाहन केलं. सौदी प्रेस एजन्सीने या भेटीबद्दल माहिती देताना, दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चेसोबतच वर्तमान स्थितीवर चर्चा झाली. तसेच दहशतवाद विरोधातील हा लढा मुस्लिमांच्या हिताचा असल्याचं सौदी राजे सलमान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना स्पष्ट केलं.